मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचे १२५ कोटींचे बिल थकीत, मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले..
By दीपक देशमुख | Published: December 30, 2023 05:16 PM2023-12-30T17:16:16+5:302023-12-30T17:18:28+5:30
सातारा : सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज बांधकामाचा सुमारे १२५ कोटींचे बिल थकीत आहे. हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी ...
सातारा : सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज बांधकामाचा सुमारे १२५ कोटींचे बिल थकीत आहे. हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही महिनाभरात होईल. त्यानंतर प्रलंबीत बिलांचा विषय राहणार नाही, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे कराड उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, उपाध्यक्ष धनंजय जांभळे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना शैक्षणिक कार्यक्रमा आलो असल्याचे सांगत त्यांनी बगल दिली. महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, असे ठरलेले उत्तर दिले. सातारा लोकसभेला उमेदवार कोण याबाबत त्यांनी हे मोठे प्रश्न असून या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी असमर्थ असल्याचे मिश्किलपणे सांगत आटोपते घेतले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळी निष्ठावंत सहकारी असलेले पण सध्या अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्या माजी आनंदराव पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.