मंत्रिपद दिलं त्यांचीच पक्षाशी गद्दारी !
By admin | Published: September 3, 2016 12:22 AM2016-09-03T00:22:47+5:302016-09-03T01:05:42+5:30
पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरात कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा मेळावा
मलकापूर : कऱ्हाड दक्षिणमध्ये गेली ३५ वर्षे पक्षाने सत्ता व मंत्रिपद दिले. मात्र त्यांनीच वेळोवेळी पक्षाशी गद्दारी केली. तर दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या घरातील व्यक्तींनी विचारवंतांच्या विचाराशी गद्दारी करीत जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने विधानसभा निवडणुकीत केले. कोणताही भेदभाव न करता मी देता येईल तेवढे दिले. भविष्यातही देणार. माझी दारे जनतेसाठी सदैव खुली आहेत. आगामी निवडणुका एक ताकदीने लढवूया,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कऱ्हाड दक्षिण काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक अभय छाजेड, तौफिक मुलाणी, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, विजयराव कणसे, अधिकराव पाटील, राजेंद्र चव्हाण, जयवंत जगताप, मलकापूरच्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, उदय थोरात, आर. टी. स्वामी आदींची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, ‘मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यभर कारभार सांभाळताना कऱ्हाडकडे थोडे दुर्लक्ष झाले, हे मला मान्य आहे. मात्र, माझ्या गैरहजेरीतही तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. जनाधाराची घमेंड उतरली. कऱ्हाड दक्षिणमधे जे ३५ वर्षांत जमले नाही, ते केवळ चार वर्षांत करून दाखवले. कोट्यवधीची कामे सुरू आहेत. कोणताही भेदभाव न करता गरज असेल तिथे काम दिले ही सर्व कामे पूर्ण होणारच.’
निरीक्षक अभय छाजेड म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या कामाचा तळागाळापर्यंत प्रसार करा. भाजप सरकारच्या
अपयशामुळे राज्यात सध्या विनयभंगात देशात १ नंबर तर अत्याचारात २ नंबर बनले आहे. सध्याचे राज्य व केंद्र
सरकार फसवे आहे. अशा फसव्यांचा पाडाव करण्यासाठी संघटित व्हा.’
मनोहर शिंदे यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
युवकांना प्रवाहात घेणार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. विकेंद्रीकरणासाठी अनेक नगरपंचायती निर्माण केल्या. १ हजार ७०० कोटींचा निधी कऱ्हाड तालुक्यासाठी दिला. सर्व कामेही मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. हे करीत असतानाच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे, अशी माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.