कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्या, मंत्री शंभूराज देसाईंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:24 PM2022-09-03T19:24:53+5:302022-09-03T19:25:23+5:30
त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची सुपारी याच व्यक्तीने कुणाला तरी दिली होती.’
रहिमतपूर : ‘रहिमतपूर नगरपरिषदेत काम करत असताना ‘आर ला कारं’ करायची वेळ आली तर मागे सरकायचे नाही. विनाकारण कुणाच्या अंगावर जायचं नाही, पण कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचे,’ असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
रहिमतपूर येथे शुक्रवारी आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण माने होते. यावेळी संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, जयवंत शेलार, सुरेश भोसले, ज्ञानेश्वर गोडसे, प्रशांत साळुंखे, दत्ता भोसले उपस्थित होते.
त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले
शंभूराज देसाई म्हणाले, ‘भाजप-शिवसेना युतीतून २०१९ मध्ये निवडणूक लढविली. मतदारांनी पाठबळ दिल्याने भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले; परंतु भाजपऐवजी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही किंगमेकर म्हणून काम करत मुख्यमंत्रिपद सामान्य शिवसैनिकाला द्यावे. शिवसैनिकांचे होते परंतु उद्धव ठाकरेंच्या कायमजवळ असणारी व्यक्ती जी पंधरा दिवसांपासून जवळ दिसत नाही. त्या व्यक्तीने चुकीची माहिती दिल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची सुपारी याच व्यक्तीने कुणाला तरी दिली होती.’
‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना पक्षाला वेळ देण्यासाठी मर्यादा आल्या. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या वाढल्यामुळे शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांना ते वेळ देऊ शकले नाहीत. ते हळूहळू शिवसैनिकांपासून दुरावले. मुंबई बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराबरोबर संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला कुणी बसवले? या कृतीतूनच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी केली. यामुळेच शिवसेनेत उठाव झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर नैसर्गिक युती करून भाजप-शिवसेना असे नवीन सरकार बनले.
मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे निर्णय उपमुख्यमंत्रीच घ्यायचे
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. उद्धव ठाकरे अनेकदा गैरहजर असत; परंतु त्याची उणीव उपमुख्यमंत्री अजित पवार भरून काढायचे. मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे निर्णय उपमुख्यमंत्रीच घ्यायचे. त्यामुळे जनतेला वाटायचे सरकार अजित पवारच चालवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेना चौथ्या नंबरला गेली.
रहिमतपूरला संपर्क संपर्कप्रमुखपद असतानाही मेळावा नाही
रहिमतपूरला राज्यस्तरावरील संपर्कप्रमुखपद असताना शिवसेनेच्या मंत्र्याला बोलावून रहिमतपूरला कधी मेळावा झाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे तत्कालीन उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्यावर शंभूराज देसाई यांनी घणाघात केला.