"शिवसेनेच्या बोटाला धरून भाजपा मोठी झाली; चंद्रकांत पाटलांनी नैराश्येतून बोलणं टाळावं, अन्यथा..."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 05:37 PM2021-12-10T17:37:53+5:302021-12-11T12:17:21+5:30
माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे.
सातारा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. भाजपच्यावतीने अनेक तारखा महाविकास आघाडीचे सरकार पडण्याबाबत त्यांनी दिल्या. कधी दोन महिन्याच्या तर कधी दोन वर्षांच्या. पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब हे आमचे नेतृत्व कणखर आणि अभ्यासू आहे. अनेक संकट आली त्या संकटात आली. त्या संकटाला आम्ही धीराने सामना केला. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे, तुमच्या भाजपचेही केवळ दोनच खासदार होते सुरुवातीला. इतर पक्षांची जवळीक त्यावेळी करून सरकार केले होते हे विसरला काय?
आज प्रमोद महाजन नाहीत, गोपीनाथ मुंडे नाहीत त्यांनी भाजपसाठी मेहनत घेतली. लालकृष्ण अडवाणी साहेब आहेत त्यांना चंद्रकांत पाटलांनी विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटाला धरुनच महाराष्ट्रात गाव पातळीवर भाजपा पोहचली आहे. निवडणुकीवेळी युतीधर्म शिवसेनेने पाळला होता. त्यानंतर भाजपने युती धर्म पाळला नाही हेही त्यांनी तपासावे, अशी टीप्पणी केली.
एसटी कर्मचा-यांना ४१ टक्के पगारवाढ दिली आहे. तरीही कर्मचारी कामावर येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तिथे एखादी संघटना म्हणून कारवाईमध्ये दुजाभाव केला जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे, लोकांना सेवा द्यावी, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.