Satara Crime: साताऱ्यात चालत्या एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:46 IST2025-03-04T13:28:03+5:302025-03-04T13:46:50+5:30
Satara ST Bus Sexual Harassment: साताऱ्यात पोवई नाक्यावर एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केला.

Satara Crime: साताऱ्यात चालत्या एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
सातारा: ‘तू माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आहे. तुला ज्यांनी माझ्यापासून लांब केले आहे. त्यांना मी सोडणार नाही,’ असे म्हणत अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवार, दि. २ मार्च रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावर घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातून एसटी साताऱ्यात येत होती. त्या एसटीमध्ये एका अल्पवयीन मुलीला ओंकार घाडगे याने मुलीशी उद्धट भाषेत बोलण्यास सुरुवात केली. ‘तू माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आहेस. तुला ज्यांनी माझ्यापासून लांब केले आहे त्यांना मी सोडणार नाही,’ असे म्हणून त्याने मुलीचा हात धरला.
या प्रकारानंतर मुलीने तातडीने याची माहिती तिच्या मैत्रिणींना दिला. बसस्थानकात उतरल्यानंतर संशयित तेथून पसार झाला. भयभीत झालेल्या मुलीने घरी गेल्यानंतर तिच्या पालकांना एसटीत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी रविवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत.