मिरगाव टँकरमुक्तीच्या वाटेवर!
By Admin | Published: February 3, 2015 09:20 PM2015-02-03T21:20:21+5:302015-02-03T23:53:15+5:30
जिल्हाधिकारी : जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींचा आराखडा
सातारा : फलटण तालुक्यातील मिरगाव अवघ्या १५ दिवसांत टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तलावांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘फलटण तालुक्यातील मिरगाव हे पारंपरिक टंचाईग्रस्त गाव होते. या गावामध्ये लोकसहभागातून बंंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामध्ये धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी विहिरीचे पुनर्भरण झाले. या विहिरीतील पाण्याच्या पातळीत ४ मीटरने वाढ झाली. त्याचबरोबर आजूबाजूची विंधन विहिरीचेही पुनर्भरण झाले. याच धर्तीवर पहिल्या टप्प्यामध्ये यांत्रिकी विभागाच्या मदतीने १00 पाझर तलावांचे गाळ काढणे व दुरुस्ती व उर्वरित १00 पाझर तलाव लोकसहभागातून दुरुस्ती व गाळ काढणे, अशी कामे करायची आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा.’ हा विशेष कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचा आहे. विविध कॅनॉलच्या परिसरात असणाऱ्या सामाजिक संस्था, उद्योजकांना पत्र पाठवून कॅनॉलच्या दुरुस्तीबाबत, गाळ काढण्याबाबत त्यांचा सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रामसभेच्या अजेंड्यावर जल अंदाजपत्रक असावे. तसेच जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी मांडली.
जलयुक्त शिवार समितीतील इतर सदस्यांनीही यावेळी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाने कंबर कसली
दर महिन्याला जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणारे बातमीपत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल. यामध्ये या अभियानाबाबत असणारे शासन निर्णय, लोकसहभागातून झालेली कामे, झालेल्या कामांची माहिती, यशोगाथा, विविध वर्तमानपत्रांतून प्रसिध्द झालेल्या बातम्यांबाबत लेख, शेतकरी, सरपंच यांची मनोगते आणि उद्दिष्ट दिलेल्या २१५ गावांची यादी यांचा समावेश यामध्ये असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाची आवश्यकता आहे. सामाजिक संघटनानाही यात सहभाग घेऊ शकतात.