मुंबईत हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 05:22 PM2019-12-05T17:22:24+5:302019-12-05T17:23:58+5:30
मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
वेळे : मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी की, पाचवड बसस्थानक परिसरात मंगळवार, दि. ३ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास एक पंधरा वर्षीय मुलगी संशयास्पदरीत्या फिरत असताना आढळून आली. म्हणून भुर्इंजचे पोलीस हवालदार शिवाजी तोडरमल, शंकर घाडगे, धनाजी कदम व महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली क्षीरसागर यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने स्वत:चे नाव व मुंबईतील पत्ता सांगितला.
ती शाळा सुटल्यानंतर तुर्भे येथून दुपारी साडेबारा वाजता घरात न सांगता साताऱ्याला निघाली होती. याचदरम्यान ती पाचवड येथील बसस्थानकात उतरली होती. या घटनेची माहिती तिच्या नातेवाइकांना कळविण्यात आली. त्यावेळी तिचे नातेवाईक या मुलीचा नवी मुंबई येथे शोध घेत असलेबाबत समजले.
त्यांना भुर्इंज पोलीस ठाण्यात बोलावून तिला नातेवाइकांची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आपली मुलगी परत मिळाल्याचा आनंद तिचे नातेवाईक लपवू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.