राजपथावर कसरतींचे ‘मिशन 38’!
By Admin | Published: March 25, 2015 10:41 PM2015-03-25T22:41:33+5:302015-03-26T00:05:55+5:30
सातारकरांचे मणके ढिले : नगरपालिकेला मिळेना डांबरीकरणास मुहूर्त; वाहनचालकांच्या मागे खड्ड्यांचे शुक्लकाष्ट
सातारा : शहराचा मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथावर पाईपलाईनसाठी तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून या चरी केवळ थातूरमातूर भरून पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरविलीय. त्यामुळे अक्षरश: मणके घाईला येत आहेत. शहराची मुख्य ओळख असणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेला या रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त केव्हा मिळणार आणि खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी हटणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. महिनाभरापूर्वी पोवई नाक्यापासून शाहू चौकापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु तिथून पुढे राजवाड्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी राजपथावर तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या. पाईपलाईनचे काम संपल्यानंतर या चरी माती व दगडाने भरण्यात आल्या; परंतु काही चरी अद्यापही भरण्यात आल्या नाहीत. पाच-पाच फुटांवर असलेल्या या चरींमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. काहीना मणक्याचे विकारही जडले आहेत. काहीजण राजपथावरून न जाता पर्यायी रस्त्याने पोवई नाक्याकडे जातात. वाहनचालक अचानक ब्रेक लावत असल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे प्रकारही घडत आहेत. एवढेच नव्हे तर वाहनांचा मेन्टेन्स खर्चही वाढला आहे. या ना त्या कामानिमित्त नागरिकांना नेहमी घराबाहेर पडावे लागते. राजवाडा ही मुख्य बाजार पेठ असल्यामुळे राजपथावर विशेषत: नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पाचशे मीटरचे अंतरही पार करणे वाहनचालकांना आता नकोशे झाले आहे. राजपथाचे काम नेमके कोणत्या कारणामुळे खोळंबले आहे, याचा थांगपत्ता नागरिकांना लागेनासा झाला आहे. प्राधिकरणने पाईपलाईनची कामे करण्यास वेळ लावल्यामुळे रस्त्यांची अवस्था अशी झाली, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर आम्ही शहरात सध्या रस्तेच खोदले नसल्याचे जीवन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.जीवन प्राधिकरण आणि पालिका प्रशासन एकमेकांवर आरोप करण्यातच मग्न आहेत. परंतु राजपथचा प्रश्न वेगळा आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी म्हणे, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची आवश्यकता आहे. गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासन अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस सातारकरांना राजपथावरून कोकर उड्या घेत जावे लागणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राजपथ रस्त्याचे काम सुरू करायचे आहे. याला प्रशासकीय मान्यता लागते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू होईल. -दिलीप चिद्रे, नगर अभियंता, सातारा पालिका पालिकेतील बहुमताच्या सत्तेमुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? असा आरोप शहरातील नागरिक जाहीरपणे विचारू लागले आहेत. ‘आम्ही कर भरतो, आम्हाला सुविधा द्या,’ असा टाहोही नागरिकांनी फोडला आहे.