ओसाड माळावर आता ‘मिशन ग्रीन माण’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:17 PM2018-06-07T21:17:28+5:302018-06-07T21:17:28+5:30
वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर आता माणमधील व मुंबईसह राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाºयांना ग्रीन माण तालुका बनविण्याचं ध्येय लागलं आहे.
नितीन काळेल
सातारा : वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर आता माणमधील व मुंबईसह राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रीन माण तालुका बनविण्याचं ध्येय लागलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत माळरानासह सीसीटी, शेतीच्या बांधावर एक लाख झाडे लोकसहभागातून लावण्यात येणार आहेत. तर बनगरवाडी (वरकुटे मलवडी) या गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून त्याला ठिबक करण्यात येणार आहे. त्यामुळे हिरव्यागार माण तालुक्याची ही सुरुवात होणार आहे.
माण तालुका डोंगर, माळरानाचा. पावसाळ्यात होणाºया पावसावर येतील लोकांची भिस्त. दरवर्षीची पावसाची सरासरी ४५० मिलीमीटर; पण दोन-चार वर्षांतून पावसाचे कमी प्रमाण. मग लोकांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ यायची. जनावरांसाठी छावण्या, चारा डेपो सुरू व्हायचे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे अनेकजण घरदार सोडून दूर जायचे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील लोकांनी निसर्गाचा चांगला फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला त्याच प्रमाणात यशही मिळू लागलं आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा जलसंधारण आणि मनसंधारण करून गेली. त्यामुळे यावर्षी १०६ पैकी ६० च्यावर गावे या स्पर्धेत उतरली. या स्पर्धेतून जलसंधारणाचं मोठं काम झालं आहे. आता फक्त पावसाचीच आस आहे. पाऊस कमी पडला काय आणि मोठा झाला तरी त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे.
आता वॉटर कप स्पर्धा संपली असून, येथील लोकांना वेध लागले आहे ते वृक्षारोपणाचे. कारण, माण तालुक्यातील अधिकाऱ्यांनी आता हिरवा माण तालुका करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी लोकांना जागृत करून मिशन ठरविण्यात आलं आहे. काही गावांनी वृक्षारोपणासाठी खड्डेही काढले आहेत. फक्त आता पाऊस पडण्याची त्यांना वाट पाहावी लागत आहे. येत्या काही दिवसांत माणमध्ये एक लाखाच्यावर नवीन झाडांची भर पडणार आहे. यामध्ये करंज, लिंब, बाभूळ, जांभळ, खैर, शिसव, वड, पिंपळ, कांचन, पिंपरण आदी झाडांचा समावेश असणार आहे. कारण, माण तालुक्यात कमी पर्जन्यमान असते. ऊनही असल्यामुळे अशा वातावरणात जगणाºया झाडांचीच त्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे सर्व होणार आहे ते अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आणि लोकांच्या सहकार्यातून.मंत्रालयातील उद्योग विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले यांच्या प्रयत्नातून कुकुडवाड, आगासवाडी परिसरात किमान एक लाख वृक्षारोपणाचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विरळी, चिलारवाडी, धामणी आदी गावांतही वृक्षारोपण होणार आहे.
झाड जगविण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर...
बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गावाचे वॉटर कपमध्ये मोठे काम झाले आहे. आता या गावाने वृक्षारोपणाचा विडा उचलला आहे. त्यासाठी हजारो झाडे तयार करण्यात आली असून, खड्डे काढण्याचे काम सुरू आहे. या गावातील व आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून जाणाºया वरकुटे मलवडी-श्री भोजलिंग डोंगर पायथा रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या लावलेल्या झाडांना पाण्याची कायमची सोय व्हावी, यासाठी ठिबक करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार झाडांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच हे झाड जगविण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर राहणार आहे. त्यामुळे झाड जगण्याची १०० टक्के खात्री वाढली आहे.
सीसीटीतही झाडे...
वॉटर कप स्पर्धेत सीसीटीची कामे झाली आहेत. त्या सीसीटीतही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच मोकळे माळरान, बांध, ताली या ठिकाणीही झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी संबंधित लोकांवर झाड जगविण्याची जबाबदारी टाकण्यात येणार आहे.
वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा संपला असून, आता आम्हाला वृक्षरोपणाचं ध्येय लागलं आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात किमान एक लाखाच्यावर झाडे लावण्याचे ठरविले आहे. झाडं लावली तरी त्याची जबाबदारी लोकांवर असणार आहे. दरवर्षी वृक्षारोपण करून माण तालुका हिरवागार आणि संतुलित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. नामदेव भोसले, उपसचिव उद्योग विभाग