सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस; कोयनेत दोन टीएमसीने वाढ

By नितीन काळेल | Published: July 3, 2024 07:08 PM2024-07-03T19:08:36+5:302024-07-03T19:09:00+5:30

नवजाला १०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नाेंद 

Misty rain in western part of Satara district; Koyna dam increased by two tmc | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस; कोयनेत दोन टीएमसीने वाढ

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस; कोयनेत दोन टीएमसीने वाढ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून धुवाॅंधार पाऊस पडत असून २४ तासांत कोयनानगरला १३३ तर नवजा येथे १०२ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात साठ्यातही जवळपास दोन टीएमसीने वाढ झाली. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २३ टीएमसी साठा झाला होता. तर सातारा शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसंकट कमी झाले. त्यातच मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. सोमवारपासून तर या भागात धुवाॅंधार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे आणि नाले खळाळून वाहू लागले आहेत. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तसेच जोरदार पावसाने घाटात छोट्या दरडी कोसळणे, झाडे कोसळणे असे प्रकार होत आहेत. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाच्या झडी येत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी खोळंबा होत आहे.

पश्चिम भागात पाऊस होत आहे. त्याचबरोबर प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे १३३ मिलीमीटर पडला. तर एक जूनपासून १ हजार ७८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजा येथे १०२ तर आतापर्यंत १ हजार २३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच महाबळेश्वरच्या पावसानेही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. महाबळेश्वरला २४ तासांत ४५ आणि जूनपासून आतापर्यंत १ हजार २२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

धरणक्षेत्रात पाऊस कायम असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २१ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २३ टीएमसीवर पोहोचला. तर २४ तासांत पाणीसाठ्यात पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे.

गतवर्षीपेक्षा कोयनेला ५९८ मिलीमीटर पाऊस..

जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अधिक राहिले आहे. गेल्यावर्षी ३ जुलैपर्यंत कोयनानगर येथे फक्त ५९८ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर नवजाला ८४२ आणि महाबळेश्वरला ९४९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. तर कोयना धरणात फक्त १४.६९ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोयना धरणात जवळपास आठ टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे.

Web Title: Misty rain in western part of Satara district; Koyna dam increased by two tmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.