भिंतीवर डोके आपटून मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:05 PM2018-03-11T23:05:25+5:302018-03-11T23:05:25+5:30
सातारा : दारू वाटपाच्या वादातून राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय ४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) याचा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना सातारा नगरपालिका आवारात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासांत सराईत गुंड युवराज ऊर्फ बाबू रामचंद्र भोसले (३४, केसरकर पेठ, सातारा) याला अटक केलीे.
याबाबत माहिती अशी की, मृत राजेंद्र सूर्यवंशी (४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) हे रोज रात्री सातारा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग तळमजल्याच्या मोकळ्या जागेत झोपत असे. शनिवारी रात्री राजेंद्र आणि युवराज भोसले त्या ठिकाणी आले. दोघेही दारू पित बसले होते. दरम्यान, दारूचे वाटप कमी जास्त असल्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी युवराजने रागाच्या भरात राजेंद्रचे डोके भिंतीला आपटले. यात राजेंद्रच्या डोक्यातून रक्तस्रावहोऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर युवराजने त्या ठिकाणावरून पळ काढला. नगरपालिकेचे काही कर्मचारी रविवारी सकाळी आले असता त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि कर्मचाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण केल्यानंतर पंचनामा केला. मृत राजेंद्रचा भाऊ शेखर बबन सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या चार तासांत उलगडा
शहराच्या मध्यभागी ही घटना घडल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पंचनामा करीत असताना मृत राजेंद्र याच्यासोबत एकजण दारू पित बसला होता, अशी माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड यांच्या पथकाने आरोपी युवराज भोसले याला देवदर्शनाला जात असताना पोलीस करमणूक केंद्र परिसरातून ताब्यात घेतले.
युवराजचा भाऊही आहे गजाआड
खुनाच्या आरोपीखाली अटक केलेला युवराज भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पत्नीस जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच काही दिवसांपूर्वी केसरकर पेठेतील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात त्याचा भाऊ भरत भोसले अटकेत आहे. या खून प्रकरणाची माहिती मृत राजेंद्र सूर्यवंशी याने पोलिसांना दिली असल्याचा संशय युवराजला होता. त्याचाही राग मनात असताना दारू वाटण्यावरून दोघांत वाद झाला. या वादात त्याने राजेंद्रचा भिंतीवर डोके आपटून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासांत या खूनाचा उलगडा झाला.