ST Strike: सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद, प्रवाशांचे हाल
By जगदीश कोष्टी | Published: September 3, 2024 04:08 PM2024-09-03T16:08:25+5:302024-09-03T16:09:53+5:30
आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता
सातारा : एसटीच्या खासगीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. अधूनमधून गाड्या धावत होत्या. मात्र असंख्य फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह हजारो प्रवासी एसटीची वाट पाहत थांबले होते.
राज्य परिवहन महामंडळात खासगी गाड्या येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे एसटीतील तेरा संघटनांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबरपासून बंदचा इशारा दिला होता. यामध्ये सातारा जिल्ह्यातही अनेक बसस्थानकाला फटका बसला आहे. कऱ्हाड, वडूज, मेढा, फलटण, पारगाव-खंडाळा आदी आगारात शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात अधूनमधून गाड्यांची वर्दळ होती. मात्र ज्या गाड्या सोमवारी इतर जिल्ह्यात मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या आहेत, त्या गाड्या परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात का होईना फायदा झाला आहे. मात्र सायंकाळनंतर आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटी महामंडळाच्या भल्यासाठी कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. प्रवाशांचे हाल व्हावेत, असे कोणालाही वाटत नाही. पण, सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याने हे आंदोलन करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी चर्चेला बोलावले आहे. त्यानंतर दिशा ठरणार आहे. - शिवाजीराव देशमुख, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.