वरूडमध्ये उभे राहतेय ‘मियावाकी’ जंगल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:37 AM2021-03-21T04:37:59+5:302021-03-21T04:37:59+5:30
औंध : खटाव तालुक्यातील वरूड येथील ओसाड माळरानावर वृक्षांचे जंगल उभे करण्याचे काम सुरू झाले असून, दुष्काळी भागात प्रथमच ...
औंध : खटाव तालुक्यातील वरूड येथील ओसाड माळरानावर वृक्षांचे जंगल उभे करण्याचे काम सुरू झाले असून, दुष्काळी भागात प्रथमच एवढे मोठे मियावाकी संकल्पनेतून अरण्य उभे राहणार आहे. सुमारे अडीच एकर क्षेत्रावर हे जंगल उभे राहणार असून, नेमके काय काम चालले आहे, कसे उभे राहणार ‘मियावाकी जंगल’ याची उत्सुकता खटाव तालुक्यासह सगळीकडे लागली आहे.
औंध-वरूड रस्त्यालगत ग्रामतलावाच्या शेजारी गायरान जमिनीत हा प्रकल्प उभा राहणार आहे. अडीच एकर क्षेत्रावर या प्रकल्पासाठी सुमारे ५०० हायवा टिप्पर गाळाची माती, २५ टन गांडूळ खत, १८ टन कोकोपीठ, २० टन भाताची तूस, १० टन बायोकंपोस्ट, २ टन निमकेक पावडर वापरून येथे मोठे जंगल उभे राहत आहे. यामध्ये तब्बल ४८ प्रकारची दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही सर्व सामग्री वरूड येथे दाखल झाली आहे. पाणी फाउंडेशन सेट्रीज इन्व्हायरमेंटल यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने युद्धपातळीवर काम सुरू आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय केली जाणार आहे.
दुष्काळी खटाव तालुक्यात पाणी फाउंडेशनमध्ये विशेष व उल्लेखनीय कामगिरी तालुक्यातील गावांनी उत्तमरीत्या केली. ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. मार्च उलटू लागला तरी अद्याप टँकर धावताना दिसत नाही तर शेतीचे दोन्ही हंगाम यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांचा मोठा फायदा झाला आहे. आता हा प्रकल्प सर्वांत मोठा असून, भविष्यात या प्रकल्पामुळे खटाव तालुक्यातील वरूड हे जगाच्या नकाशावर झळकणार, एवढे मात्र नक्की!
चौकट:-
‘मियावाकी’ म्हंजी काय रं भाऊ...
ही जपानी संकल्पना असून, मियावाकी यांनी जपानमध्ये हरितीकरणाचा एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग केला. जगभरात ३ हजार ठिकाणी तीन कोटींहून अधिक झाडे लावली. विशेष म्हणजे, लागवडीनंतर तीन वर्षांनी त्या ठिकाणी घनदाट जंगलच तयार झाले. मियावाकी अरण्ये ही पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत दहापट जलद वाढतात, तीसपट अधिक दाट असतात आणि शंभरपट जास्त जैवविविधता आणतात. दाट वृक्षारोपण जमिनीचे पाणी मोठ्या प्रमाणात राखून ठेवते आणि भूजल पातळी तयार होते. पर्यायाने हे जंगल पक्षी आणि कीटकांना आकर्षित तर करतेच सोबत देशी फळे आणि वायू गुणवत्ता सुधारण्यास मदतही करते.
20 वरूड
फोटो: खटाव तालुक्यातील वरूड येथे ‘मियावाकी जंगल’उभे राहत आहे, त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
े