Satara Politics: ..'हे' समजल्यानेच रामराजे विचलीत झाले, जयकुमार गोरे यांनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:00 PM2024-10-14T13:00:39+5:302024-10-14T13:02:48+5:30

आमच्या नावाखाली तुमची पापे लपवू नका

MLA Jayakumar Gore criticizes MLA Ramraje Naik Nimbalkar | Satara Politics: ..'हे' समजल्यानेच रामराजे विचलीत झाले, जयकुमार गोरे यांनी लगावला टोला 

Satara Politics: ..'हे' समजल्यानेच रामराजे विचलीत झाले, जयकुमार गोरे यांनी लगावला टोला 

दहिवडी : ‘सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलीत झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू नयेत. कुणाच्या तरी पदराआडून असल्या चाली खेळणे बंद करावे,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे यांना लगावला.

फलटणमधील कार्यक्रमात आमदार रामराजे यांनी जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरून भाजप चालणार असेल तर महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार आमदार गोरे यांनी घेतला घेतला.

आमदार गोरे म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन रामराजे महायुती सोडून जा, असे सांगत आहेत. ते स्वतः का थांबले आहेत, ते कुणालाच समजत नाही, अशी त्यांची बाळबोध कल्पना आहे. महायुतीचा प्रयोग करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिलाय. लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी कधी महायुतीला मदत केली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्यांची आणि आमची लढाई आजची नाही. २००७ सालापासून आम्ही सत्तेत नसताना, आमच्याकडे काही नसताना न रडता आम्ही ही लढाई लढत आलो आहोत. नेहमी काड्या आणि जाळ घालणारे रामराजे सत्तेत असताना, सभापती असताना त्यांनी आमच्यावर अनेक केसेस घातल्या; पण आम्ही त्यांना कधी यशस्वी होऊ दिले नाही.’

औरंगजेबनीती बंद करा..

हरियाणामधील निकालानंतर रामराजे यांचे ‘चीत भी मेरी अन पट भी मेरी’ असे राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात कुणाचीही सत्ता आली तरी आपण सत्तेबरोबर राहावे म्हणून ते चाली खेळत आहेत. आपण एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे अशी दुलदुली औरंगजेबनीती त्यांनी बंद करावी, असेही आमदार गोरे म्हणाले.

Web Title: MLA Jayakumar Gore criticizes MLA Ramraje Naik Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.