Satara- आगाशिवनगर मारहाण प्रकरण: ..अन् नितेश राणे पोलिसांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:42 PM2024-08-14T15:42:51+5:302024-08-14T15:46:30+5:30
कराड बंदची हाक मागे
मलकापूर : आगाशिवनगरात दोन समाजाच्या व्यावसायिकांमध्ये सोमवारी (दि.१२) रात्री मारहाण झाली होती. याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांची इंन्ट्री झाली. आमदार राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच ते पोलिसांवर भडकले व पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी काहीकाळ आगाशिवनगरला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
आगाशिवनगर मलकापूर ता. कराड येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकारानंतर पोलिसांनी काही लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची राणे यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी पवार कुटुंबासह जमलेल्या नागरिकांनी संबंधित व्यावसायिकाच्या आरेरावीचा राणे यांच्यासमोर पाडाच वाचला. त्याचबरोबर गुन्हा नोंद करायला गेले असता पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे सांगितले. यावेळी राणे यांनी पोलीसांना फोन लावला आणि चांगलेच फैलावर घेतले. तसेच याप्रकरणी सर्व घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले.
..आता थेट घुसण्याची तयारी - राणे
एखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी कायदा व शस्त्र हातात घेण्याचे हिंदू घराला मला सवय आहे. यापुढे आम्ही निवेदन मागण्या करत बसणार नाही, थेट घुसण्याची तयारी ठेवली आहे असा राणे यांनी इशारा दिला.
कराड बंदची हाक मागे
दरम्यान या प्रकरणावरून सकल समाजाने दिलेली आज, बुधवारी कराड बंदची हाक मागे घेतली असून प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले. तरीही अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंदच ठेवली होती.