साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल शिक्षक प्रश्नी सत्यजित तांबेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र, 'त्या' घोषणेचेही करुन दिले स्मरण
By प्रगती पाटील | Published: September 30, 2023 04:13 PM2023-09-30T16:13:06+5:302023-09-30T16:14:17+5:30
सातारच्या प्रश्नी संगमनेरचे आमदार आक्रमक
सातारा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह शाळेत मराठी आणि इंग्रजी विषय शिकवायला शिक्षक नसल्याच्या वृत्ताची दखल संगमनेरचे आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लिहिलेल्या पत्रात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत एक दिवसीय विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या घोषणेचा स्मरण त्यांनी करून दिले आहे.
शिक्षण मंत्री केसरकर यांना पाठवलेल्या पत्रात आमदार तांबे म्हणतात, 'सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भाषा शिकवायला शिक्षक उपलब्ध नसणे या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. साताऱ्यातील प्रतापसिंह शाळेत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह औंधचे संस्थानिक भगवानराव पंतप्रतिनिधी, श्रीमंत छत्रपती अण्णासाहेब भोसले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. पी. जी. गजेंद्रगडकर, दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू जी. एस. महाजनी यांच्यासह अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या शिक्षण झालं. या ऐतिहासिक आणि बौद्धिक वारसा असलेल्या शाळेत शिक्षकांची आणि शैक्षणिक दर्जाची ही अवस्था असेल तर राज्यातील इतर शाळांमधील परिस्थिती किती गंभीर आहे याचा विचार केलेला बरा!'
सातारच्या प्रश्नी संगमनेरचे आमदार आक्रमक
सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या ऐतिहासिक वारसा असलेल्या शाळेत पाच महिने मराठी आणि इंग्रजी या विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाही ही माहिती समाज माध्यमांतून संगमनेरचे आमदार सत्यजित तांबे यांच्यापर्यंत पोहोचली. याबाबत त्यांनी तातडीने शाळेचे पालक प्रशांत मोदी यांना संपर्क साधून सर्व परिस्थितीची माहिती करून घेतली त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या घोषणेचे स्मरण करून दिले.
एक शिक्षक रुजू दुसऱ्याची प्रतीक्षा
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन विषयांचे शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून नव्हते. वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बाब प्रकाश झोतात आली. त्यानंतर शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा वर्गांसाठी मराठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. इंग्रजी विषय शिकवण्यासाठी अद्यापही शिक्षकाची नेमणूक झाली नाही त्यामुळे सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर कसा लिहावा असा प्रश्न पालकांना सतावत आहे.