Satara Lok Sabha 2024 : "कोण लढतंय का बघा, नाही तर...", सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 05:10 PM2024-04-07T17:10:06+5:302024-04-07T17:13:19+5:30
Satara Lok Sabha 2024 : महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Satara Lok Sabha 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात संपर्क दौराही वाढवला आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे, यामुळे आता महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार या चर्चा सुरू आहेत.
मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय
दोन दिवसापूर्वी आमदार शशिकांत शिंदे आणि सारंग पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीवर चर्चा केली. दरम्यान, आज एका मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे अशी लढत होऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत.
आज एका कार्यक्रमात बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, परवा शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा. १९९९ साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून हा जिल्हा जास्त आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.ज्यावेळी संघर्षाचा काळ आला त्यावेळी कोण उभं रहायचं अशा चर्चा सुरू झाल्या. बरीच लोक म्हणाली की, आता राज्यात बरं आहे. कारण पुढं राज्यात सरकार लागणार आहे मग कशाला वरती जावं आपली संधी लागते. तेव्हा मी परवा साहेबांना सांगितलं, कोण लढतंय का नाही बघा नाहीतर शशिकांत शिंदे आहेच', असं शिंदे म्हणाले.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
शशिकांत शिंदे म्हणाले, विषय पदाचा नसतो, विषय संघर्षाचा असतो, माझ्यावर आता दुसऱ्यांदा केस टाकली आहे, असंही शिंदे म्हणाले.