खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
By दीपक देशमुख | Published: April 18, 2023 03:53 PM2023-04-18T15:53:30+5:302023-04-18T15:55:57+5:30
राज्यातील घडामोडीबाबत वेट ॲंड वाॅच भुमिका
सातारा : सातारा मेडिकल कॉलेजचे काम काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काहीजणांनी काम बंद पाडले. ठेकेदाराला त्रास देवून आर्थिक मागणी होत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या कामाला संरक्षण द्यावे. तसेच कोणताही खाणपट्टा नसताना, रॉयल्टी न भरता खिंडवाडीतील उत्खनन सुरू आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तसेच खासदार कमी बोलतात पण त्यांचे काम हे मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली, अशा पद्धतीचे असल्याचा टोलाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
सातारा येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेवून झालेल्या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आदल्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आ. शिवेद्रराजे भोसले म्हणाले, खा. उदयनराजेंचे लोक बाजार समितीच्या सत्तेतून दंगा करून बाहेर पडले. सचिव मनवे यांच्याबद्दल ते बाेलत असले तरी काेर्टाने मनवेंच्या बाजून निकाल दिला. त्यानंतरच त्यांना कामावर हजर करून घेतले आहे. त्यामुळे कोर्टाचा निकाल त्यांना मान्य नाही काय. ते कोर्टापेक्षा मोठे आहेत काय ? ते म्हणतील तेच खरे काय ? असा सवाल त्यांनी केला.
बाजार समितीच्या सतरा एकर जागेचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. जागेचा ताबा आमचा असून सातबाऱ्यावर बाजार समितीचे नाव लागले आहे. काही लोकांचा प्रयत्न ही जागा परत मिळावी, त्याचे प्लॉट पाडून कोट्यवधी कमावण्याचा इरादा होता. पण, आमची साथ मिळाली नाही म्हणून ते बाजूला झाले. आमचा हेतू बाजारपेठ वाढावी हा आहे. निवडणुकीनंतर फळे व भाजीपाला मार्केट, व्यवसायिक गाळे, जनावरांचा दवाखाना, सुसज्ज पार्किंग असा अद्ययावत प्लॅन केला आहे. बाजार समिती शहराबाहेर गेल्यास मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.
राज्यातील घडामोडीबाबत वेट ॲंड वाॅच भुमिका
राज्यात सुरू असलेल्या घडामोडीबाबत पत्रकारांनी छेडले असता आ. शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले, हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. पण वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची वाटचाल ठेवू. सध्या तरी याबाबत वेट ॲंड वॉचच्या भुमिकेत आहे.