विकासकामांच्या उद्घाटनावरुन शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला, म्हणाले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 02:42 PM2021-12-15T14:42:07+5:302021-12-15T14:42:37+5:30
साताऱ्यात सध्या नारळ फोडणारी गॅँग निर्माण झाली आहे, जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात.
सातारा : ‘सातारा शहरात सध्या नारळफोड्या गॅँगचा सुळसुळाट सुरू आहे. जे काम मंजूर होईल त्याचा नारळ फोडण्याचं काम काही मंडळींकडून सुरू आहे,’ असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.
सातारा शहरातील एका कार्यक्रमानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शाहूपुरीकरांना वीस वर्षे पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, असे ते म्हणतात; परंतु येथील ग्रामपंचायतीत इतकी वर्षे त्यांच्याच कार्यकर्त्यांची सत्ता होती. मग का पाणी मिळाले नाही हे त्यांनीच सांगावे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी दुसऱ्यांवर खापर फोडण्याचा प्रकार त्यांनी आता थांबवावा.
सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय यापूर्वी झाला असता. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन वर्षांपासून ही हद्दवाढ रखडली होती. पालिकेत सत्ताधाऱ्यांनी केवळ बोगस बिले काढण्याचे काम केले. साताऱ्यात सध्या नारळ फोडणारी गॅँग निर्माण झाली आहे, जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. आता पालिकेच्या निवडणुकीत मते पाहिजेत म्हणून स्वत:चे अपयश दुसऱ्यावर टाकण्याचे काम ते करत आहेत. याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.