आमदारांचा ‘जय’ रोखण्यासाठी झाडून सारे एक !
By admin | Published: April 2, 2015 12:06 AM2015-04-02T00:06:02+5:302015-04-02T00:38:22+5:30
माण तालुका : एकास-एक लढत होणार; ४४ ठराव असल्याचा विरोधकांचा दावा--सांगा... डीसीसी कुणाची?
नितीन काळेल -सातारा -सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायचा बाकी असला तरी माण तालुक्यातील वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. गेल्यावेळी सदाशिवराव पोळ यांना चांगली लढत देणाऱ्या आमदार गोरे यांची यंदा प्रथमत: बाजू भक्कम होती; पण गेल्या काही दिवसांत ती कमकुवत होत चालली आहे. त्यांच्याविरोधात सोसायटी मतदारसंघातून विरोधकांतर्फे एकच उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यातच आमदार गोरे यांच्या विरोधकांनी आमच्याकडे ४२ ते ४४ सोसायट्यांचे ठराव असल्याचे स्पष्ट केल्याने आमदार गोरेंचा ‘जय’ रोखला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक मे महिन्याच्या प्रारंभी होत आहे. सध्या सोसायट्यांच्या ठरावाच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इतर तालुक्यात राजकीय धुसफूस फारशी दिसत नसली तरी माण तालुका त्याला अपवाद राहिलेला आहे. माणमधील सोसायटी ठरावाच्या निमित्ताने अनेकांना जेलवारीही करावी लागली आहे. मारामारी, दरोडा, शासकीय मालमत्तेचे नुकसान असे गुन्हे तालुक्यातील अनेक जणांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे माणमधून जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे हे दोघेही जिल्हा बँकेत ‘डायरेक्टर’ म्हणून जाणारच, असा दावा करीत आहेत. दुसरीकडे जिल्हा बँकेत ४३ वर्षे संचालक म्हणून काम करणारे माजी आमदार सदाशिवराव पोळ हेही इच्छुक आहेत. त्यांनी कधीच याबद्दल इन्कार केलेला नाही. त्यामुळे आताची माणच्या सोसायटी मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची राहणार हे निश्चित आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून माणच्या सोसायट्यांचे गणित रंगू लागले आहे. काही सोसायट्यांचे ठराव झाले तर काहीची निवडणूक झाली. सुरुवातीला आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हा बँक निवडणूक सोपी दिसत होती. त्यांनी खटावमधून निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले होते. तर माणमधून ते सहकाऱ्याला संधी देण्याच्या विचारात होते; पण,आज स्वत:च्या तालुक्यातच त्यांना जोरदार विरोध होऊ लागला आहे. माजी आमदार सदाशिवराव पोळ आणि पंचायत समिती सदस्य शेखर गोरे हे एकत्र आले आहेत. या दोघांच्या ताकदीमुळेच तालुक्यातील अनेक सोसायट्या व त्यांचे ठराव शेखर गोरे आणि पोळ यांच्या बाजूने झालेले आहेत. दोघांनीही आपला विरोधक आमदार गोरे आहे, हे जणू ठरवूनच टाकले आहे. पण या दोघांत जिल्हा बँक निवडणुकीसाठी कोण उतरणार, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
माजी आमदार पोळ यांनी तर आमच्या बाजूने जवळपास ४२ ते ४४ ठराव असल्याचा दावा केला आहे. माण तालुक्यात ७६ सोसायट्या आहेत. त्यापैकी ४४ ठराव विरोधकांकडे याचाच अर्थ आमदार गोरेंना ही धोक्याची घंटा ठरू शकते. आमदार गोरे आता कोणत्या स्टाईलने यावर मात करतात, ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणारे आहे. त्यातच ते माण की खटाव तालुक्यातून निवडणुकीसाठी उतरणार हेही स्पष्ट केलेले नाही.
तेरा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक असणारे व जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई या निवडणुकीतही औद्योगिक विणकर मतदारसंघातून असणार आहेत. जिल्हा बँकेसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पॅनेल ठरवतील त्यामध्ये ते असणार आहेत. त्यांच्या पॅनेलमधून माणमधून सदाशिवराव पोळ नाही तर शेखर गोरेंना तिकीट मिळो, त्यांच्या पाठीशी देसाई राहणार. त्यामुळे आमदार गोरेंच्या विरोधात झाडून सारे एकत्र येणार हे आज तरी स्पष्ट झालेले आहे.
आम्ही दोघे एकत्र; पण उमेदवार कोण?
सुमारे एक महिन्यापूर्वी शेखर गोरे यांनी माजी आमदार पोळ व मी एकत्र असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोघांनीही पडद्याआड राहून सोसायटी निवडणुका लढविल्या. तसेच अनेक सोसायट्यांचे ठराव करून घेतले. आता माजी आमदार पोळ यांनी शेखर गोरे आणि आम्ही एकत्रच काम करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोघांचीही ताकद वाढली आहे. या दोघांत उमेदवार कोण, हे मात्र स्पष्ट व्हायला वेळ लागणार आहे.
मी आणि शेखर गोरे एकत्र काम करीत आहोत. बँकेच्या निवडणुकीसाठी मी इच्छुकच आहे. सध्या आमच्या बाजूने ४२ ते ४४ सोसायट्यांचे ठराव आहेत. या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येण्याचा सध्यातरी अंदाज वाटत आहे.
- सदाशिवराव पोळ,
माजी आमदार
आमचे वरिष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांच्या पॅनेलमधून मी ‘औद्योगिक-विणकर’ मतदारसंघातून निवडणुकीत असणार आहे. आमच्या पॅनेलमधून माण सोसायटी मतदारसंघातून कोण उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी मी राहणार आहे.
- अनिल देसाई,
संचालक जिल्हा बँक
दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण...
माण तालुक्यात ७६ सोसायट्या आहेत. आतापर्यंत ७३ सोसायट्यांचे ठराव झाले आहेत. तीन सोसायट्यांचे ठराव बाकी आहेत. दि. ३ एप्रिलपर्यंत ठरावाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यांनतर यादी प्रसिद्ध होईल व जवळपास सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.