‘प्राधिकरणा’त आज आमदारांची भाजीमंडई!
By admin | Published: July 6, 2016 11:29 PM2016-07-06T23:29:57+5:302016-07-07T00:50:07+5:30
दहा दिवसांची ‘डेडलाईन’ संपली : अधिकारी न नेमल्याने शिवेंद्रसिंहराजेंकडून आंदोलन
सातारा : ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सातारकरांना बसत आहे. त्यामुळे दहा दिवसांत कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करा; अन्यथा आवारात भाजीमंडई स्थापन करू,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला होता. त्याची मुदत संपल्यामुळे गुरुवारी सकाळी आवारात भाजीमंडई थाटली जाणार आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, पाच-पाच महिने गळती निघत नाही. पाणी पुरवठ्याची बोंबाबोंब, यामुळे प्राधिकणाबाबत सातारकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. गेल्या पाच वर्षांत कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता प्राधिकरणाला मिळाला नाही. त्यामुळे दहा दिवसांत प्रशासनाने प्राधिकरणाच्या कार्यालयाला एक कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता द्यावा; अन्यथा प्राधिकरणच्या आवारात भाजीमंडई स्थापन करून व जागेचा सदुपयोग करू,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी दि. २७ जून रोजी दिला होता. दि. ६ जुलै रोजी या इशाऱ्याला दहा दिवस झाले. तरीही प्राधिकरणने सक्षम अधिकारी नेमला नाही. त्यामुळे ुगुरुवारी सकाळी ‘प्राधिकरण’च्या आवारात भाजीमंडई भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी प्राधिकरणच्या आवारात भाजीमंडई थाटण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)