महागाईविरुद्ध मनसेचे आंदोलन!
By Admin | Published: October 19, 2015 11:15 PM2015-10-19T23:15:01+5:302015-10-19T23:48:45+5:30
गोदामे फोडू...
सातारा : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. अनेकदा वेळ बदलल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आधी सकाळी अकराला जाहीर झालेले आंदोलन लांबत-लांबत दीड वाजता झाले. गाडीतून आणलेले ढोलताशे वाजविण्यात आले. तसेच पक्षाचा स्कार्फ गळ्यात घालून महागाईविरोधात घोषणा देण्यात आल्या. पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प अहे. डाळी, पेट्रोल, डिझेल, कांदा, भाजीपाला व इतर खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.यासंदर्भात सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे.महाराष्ट्रात फोफावलेला प्रचंड साठेबाजार सरकारच्या आशीर्वादानेच चालू असून, काही परप्रांतीय व्यापारी अन्नधान्ये, डाळी यांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई करीत असल्याचा आरोपही संबंधितांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गोदामे फोडू...
महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रशासनाने गप्प न बसता साठेबाजांच्या गोदामांवर छापे मारून धान्यसाठा जप्त केला पाहिजे. त्याचे वाटप जनतेला केले पाहिजे. साठेबाजांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. अन्यथा मनसे जनतेच्या हितासाठी ही गोदामे फोडेल. प्रसंगी मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही. अशा वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पक्षाने दिला आहे.