मोबाइलचे कॅमेरे जेव्हा बारकावे शोधू लागतात...

By admin | Published: January 8, 2016 11:33 PM2016-01-08T23:33:09+5:302016-01-09T00:45:20+5:30

अनोखा उपक्रम : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील छायाचित्रण स्पर्धेत नूपुर सकटेची बाजी

Mobile cameras are found to be inventive ... | मोबाइलचे कॅमेरे जेव्हा बारकावे शोधू लागतात...

मोबाइलचे कॅमेरे जेव्हा बारकावे शोधू लागतात...

Next

सातारा : कॉलेज कॅम्पसमध्ये मोबाइल बाळगण्यावर बंदी असली, तरी तो जाच नसून आपल्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे, याचे आकलन होण्याबरोबरच मोबाइलच्या कॅमेऱ्यालाही उत्तमोत्तम क्षणचित्रे टिपण्याची सवय लागावी म्हणून धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात मोबाइल छायाचित्रण स्पर्धा घेण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचं हे आठवं वर्ष असून, यंदाच्या स्पर्धेत नूपुर राजेंद्र सकटे या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला.
तुषार मधुकर घोरपडे याने दुसरा तर शुभम विजय भोसले याने तिसरा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा ‘बीसीए’ अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून खास आयोजित केली जाते. विशेष म्हणजे बक्षिसे पटकावणारे तीनही विद्यार्थी ‘बीसीए’च्या पहिल्या वर्षात शिकणारे आहेत.
संगणकाशी पर्यायानं तंत्रज्ञानाशी मैत्री करताना तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. मोबाइलला
कॉलेज कॅम्पसमध्ये बंदी असली, तरी त्यामुळं आपला कोंडमारा होत असल्याची भावना होता कामा नये, म्हणून ही अनोखी स्पर्धा घेतली
जाते.
या स्पर्धेत कॉलेजच्या कॅम्पसमधील फोटोच काढायचे आणि ते मोबाइल कॅमेऱ्यानेच काढायचे, हा नियम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना रोज एक तास दिला जातो. या तासाभरात विद्यार्थी-विद्यार्थिनी कॉलेजच्या हिरवळीआड दडलेल्या जीवसृष्टीपासून कॅन्टीनमधल्या गरमागरम पदार्थांपर्यंत कशालाही आपल्या छायाचित्राचा विषय बनवतात. वेगवेगळ्या ‘फ्रेम्स’ शोधण्याचा प्रयत्न करतात. आपसूकच त्यांच्यात कलात्मक नजर विकसित होत जाते.
२००९ मध्ये फोनमधले कॅमेरे आले, तेव्हापासून आजअखेर ही अनोखी छायाचित्रण स्पर्धा अव्याहत सुरू आहे.
नुकताच या स्पर्धेसह स्थळचित्रण (स्पॉट पेन्टिंग) स्पर्धेचाही बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, विभागप्रमुख डॉ. एल. एन. घाटगे, बीसीए विभागाचे प्रा. राजेश सरक, प्रा. अभिजित वरेकर, प्रा. प्रियांका देवरे, वर्षाराणी घाटगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

स्थळचित्रणासाठी खास स्पर्धा
बसल्या जागेवरून समोर जे दिसते, ते चित्रपद्ध करण्यासाठी कॉलेजतर्फे स्पॉट पेन्टिंग म्हणजेच स्थळचित्रण स्पर्धाही घेण्यात येते. या स्पर्धेतही प्रथम वर्षात शिकणाऱ्या पूजा प्रदीप घोरपडे या विद्यार्थिनीने बाजी मारली. शीतल आनंदा जाधव आणि अमर नेताजी जाधव या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
सामोसा आणि चहा
मोबाइल फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नूपुर सकटेने कॅन्टिनमधील गरमागरम सामोसा आणि चहाचा कप ‘फ्रेम’मध्ये घेतला आहे. या फ्रेममधून सकाळचे प्रसन्न वातावरण जाणवल्यावाचून राहत नाही. याखेरीज कॉलेज कॅम्पसमध्ये दिसणाऱ्या फोटोजेनिक व्यक्ती, त्यांच्यातील सहजसुलभ क्रिया-प्रतिक्रिया, कॅम्पसमध्ये येणारे प्राणी, इतकेच नव्हे तर हिरवळीत दडलेल्या किड्या-मुंग्या आणि मुंगळ्यांच्या हालचालींचाही विद्यार्थी वेध घेऊ लागले आहेत.

Web Title: Mobile cameras are found to be inventive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.