ऑफलाईन शाळेत, मुलं ऑनलाईनच!, वर्गात मोबाईलचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 02:11 PM2021-12-08T14:11:34+5:302021-12-08T14:12:04+5:30
कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून ऑफलाईन शाळा हा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यानंतर काही प्रमाणात रिस्क घेऊन राज्य शासनाने शाळा सुरू करायला परवानगी दिली. मात्र, पावणे दोन वर्षांतील मोबाईल वापराची सवय तोडणे मुलांना शक्य होत नसल्याचे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळते. पालकांच्या परवानगीने ऑफलाईन वर्गातही विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल असल्याने ते ऑनलाईन जगात भटकंती करत असल्याचे चित्र वर्गात पहायला मिळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये मुलं मोबाईलसह दाखल होऊ लागली आहेत. वर्गात शिकविताना मुलांचे फोन वाजणे, वर्ग सुरू असताना स्टेटस अपडेट होणे हे आणि यासह अनेक प्रकार सर्रास वर्गात सुरू झाल्यानंतर शहरातील काही शाळांनी सक्तीने शाळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल न देण्याचे फर्मान काढले आहे. यावर प्रश्नांचा भडिमार करणाऱ्या पालकांनाही त्यांनी मुलांसाठी वेळ देण्याचे सूचित केले. मुलं शाळेत आल्याची आणि घरी गेल्याची खात्री करायला त्यांनी शाळेत किंवा गेटवर असणाऱ्या वॉचमनशी संपर्क साधावा असे सांगितले आहे. विद्यार्थी ज्या खासगी क्लासमध्ये जात आहे तिथे संपर्क करून तो पोहोचल्याची खात्री सहज होऊ शकते. शाळेत मोबाईल दिल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत गुरुकुल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
मोबाईल देण्याची ही सांगितली जातात कारणे
शाळा सुरू झाली असली तरीही विद्यार्थी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी शाळेपर्यंत शेअर रिक्षा, सायकल किंवा चालत जाण्याचा पर्याय स्वीकारतात. शाळेत वेळेवर विद्यार्थी पोहोचला का? याची खात्री फोन शिवाय होत नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचे कारण सांगून फोन देत असल्याचे समर्थन पालकांकडून केले जात आहे.
शाळांची भूमिका
कोरोना काळात पालकांच्या संमतीपत्राने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना न दुखावण्याचे सूत्र शाळा व्यवस्थापनाने स्वीकारले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोबाईलही काही प्रमाणात मान्य असल्याचं शाळा दर्शवतात. काही शाळांनी सक्तीने मोबाईल न देण्याच्या आणि दिला तर जो जप्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर काहींनी वर्गात येण्यापूर्वी मोबाईल बंद करून तो शिक्षकांकडे जमा करण्याचा प्रयत्नही केला आहे.
पूर्वी दंडात्मक आता स्वीकार
कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. शाळेमध्ये निषिद्ध असलेला मोबाईल विद्यार्थी सर्रास घेऊन येतात. अनेकदा हे फोन वर्ग सुरू असताना मोठ्या आवाजात वाजतात. काही विद्यार्थी याद्वारे शाळेतील रिल्स आणि स्टोरीजही ठेवू लागले आहेत. परिणामी वर्गात लक्ष कमी आणि मोबाईलमध्ये जास्त अशी परिस्थिती बघायला मिळते.
ऑनलाईन शाळांमुळे मुलांना मोबाईलची सवय लागली आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर ती सवय मोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने मुलांवर लक्ष असावे, ते सुरक्षित शाळांमध्ये पोहोचावेत यासाठी मोबाईल देणे समर्थनीय नाही. कारण काहीही अडचण आली तर मुलांना मदत करायला समाजातील कोणीही पुढे येते. पण आता मुलांच्या सांगण्याला भुलून पालकही त्यांची भाषा बोलू लागले आहेत. विद्यार्थी वाहतुकीशिवाय येणाऱ्या मुलांनी शाळेत यापूर्वी कधीच मोबाईल आणले नव्हते. - मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस