मोबाईलमध्ये मुलांची मुंडी; भलतं सलतं ढुंढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 02:06 PM2021-11-23T14:06:58+5:302021-11-23T14:07:50+5:30
प्रगती जाधव-पाटील सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने मुलांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनने मुलांपुढे अलिबाबाची गुहाच खुली केली आहे. या खजिन्यातून कोणी ...
प्रगती जाधव-पाटील
सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने मुलांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनने मुलांपुढे अलिबाबाची गुहाच खुली केली आहे. या खजिन्यातून कोणी ज्ञान मिळवतय, तर कोणाला मैत्री गवसतेय, कोणाच्या स्वप्नातील राजकुमार-राजकुमारी या पडावात सापडतायत तर उत्सुकता शमविण्यासाठी रात्रीच्या अंधारात या मोबाईलचा वापर कोणी करत आहे. खच्चून पासवर्ड, ॲप हाईड करण्याची असलेली अक्कल आणि डिलीट करण्याचे पर्याय असल्याने पालकांनी मोबाईल पाहिले तरीही त्यांना मुलांच्या मोबाईल विश्वात डोकावणं केवळ अशक्य झाले आहे. यासाठी मुलांना मोबाईल वापराचे संभाव्य धोके आणि आचारसंहिता आखून देणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
ऑनलाईन शिक्षणामुळे गेल्या दीड वर्षांपासून मुलांच्या हातात मोबाईल आल्याने मुलं त्याच्या आहारी गेल्याचे चित्र पहायला मिळते. पालकांनी मुलांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मुले काय करतात याकडे लक्ष देऊन संभाव्य धोक्यापासून त्यांना सावध करण्याची भूमिका पालकांनी घेणे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना वेळ दिला तर मुलं ही मोबाईल पासून दूर होऊन नवनवीन गोष्टींचा अंगीकार करतील.
फोन वापराची वेळ निश्चित कराच
ज्या मोबाईल पासून मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न पालक करत होते. तोच मोबाईल मुलांच्या शिक्षणाचे माध्यम बनले. दिवसातील काही तास मोबाईलवर अभ्यास केल्यानंतर त्याच्या मायावी विश्वात मुलं आपोआपच वाहवत गेली. मुलांना बाहेर जायला बंधने होते त्यावेळी मुलांना शांत बसवणारे हे साधन त्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरले आहे. मोबाईल अचानक बंद करण्यापेक्षा त्याचा स्मार्ट वापर मुलांना शिकविणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुलांना सोशल मीडिया वापरण्याचा, गेम खेळण्याची वेळ निर्धारित करून दिली तर मुलांनाही वापराची शिस्त लागते.
मोबाईलचे कौतुक नको अन् दुर्लक्षही नको
मोबाईल आपल्याला येत नाही इतकं सफाईदारपणे पोरं हाताळतात हे सांगताना पालकांना खूपच अभिमान वाटतो. पालकांच्या या प्रतिक्रियेमुळे ही मुले शेफारून जातात. मुळात मोबाईल हे करमणुकीचे नव्हे तर गरजेचे साधन आहे हे पालकांनी कृतीतून दाखवले तर मुलं ही तशीच घडतील.
असे केले तर गुन्हा ठरतो
उत्सुकता म्हणून मोठ्यांच्या साईट पाहिल्या जातात. यातील आवडलेले व्हिडिओच्या लिंक कोणालाही पाठवणे हे गुन्हा असल्याचे मुलांना माहीत नसते. वादाच्या काही पोस्ट कौतुकाने पुढे पाठविणे अनेकदा अंगलट येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी झालेल्या मैत्रीतून अश्लील
पालकांनी मुलांचे कानसेन व्हावे
किशोरवयीन मुलांमध्ये समजूतदारपणा कमी असतो. आपल्याला सगळेच कळते, आता मी मोठा झालो आहे अशा भावना त्यांच्यात तयार होते. त्यात पालकांचे मैत्रीपूर्ण संबंध नसल्यामुळे घरातून जाण्याच्या घटना घडतात. पालक जर मुलांचे झाले, तर ते सगळे शेअर करतात. पालक आणि मुलांमध्ये चांगला सुसंवाद असल्यास अनेक चुकीच्या घटना घडत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांचे उत्तम सल्लागार व्हावे आणि कानसेन बनून सगळं ऐकून घेण्याला प्राधान्य द्यावे.
नाईलाजाने मुलांच्या हातात मोबाईल दिला गेला असला तरीही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा पहिल्या दिवसापासून मी प्रयत्न केला. मोबाईल चाईल्ड लॉक लावल्याने त्याच्या वयाचे आणि गरजेचे तेवढेच त्याला पाहता येते. मुलं अनुकरण प्रिय असतात, घरात गेल्यावर मीच मोबाईल दुर ठेवते त्यामुळे त्यालाही मोबाईलची आठवण येत नाही. -डॉ. दीपांजली पवार, पालक
मुलांच्या हातात मोबाईल असेल तर त्यांना अन्य विश्व दिसत नाही. न्यूक्लिअर कुटुंबामध्ये ही अडचण सर्वाधिक जाणवते. घरात आजी आजोबा असतील तर मुलांकडे पुरेसे लक्ष देणे होते. अभ्यासासाठी ही मुलांना मोबाईल देण्यापेक्षा त्यांना लॅपटॉपवर अभ्यास करायला लावलं तर मोबाईलचा वापर कमी होण्याला ही मदत होते. ॲड. मजिद कच्छी, पालक
ऑनलाईन शिक्षणाने आव्हाने वाढविली
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. त्यांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी शारीरिक कार्यक्रम घेतले पाहिजेत. यामुळे ते घरातून बाहेर पडून स्वच्छंदी जगू शकतील. - डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा