नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:27+5:302021-02-14T04:36:27+5:30
कऱ्हाड : येळगाव (ता. कऱ्हाड) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह ...
कऱ्हाड : येळगाव (ता. कऱ्हाड) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविणे आदी कामे करता येणे मुश्किल बनत आहे.
सदाशिवगडावर दुर्गप्रेमींकडून वृक्षारोपण
कऱ्हाड : सदाशिवगडावर दुर्गप्रेमींकडून वृक्षारोपण करण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले सदाशिवगड समूहाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, दुर्गप्रेमी राकेश पोरवाल, सदाशिव मंदिराचे पुजारी आनंदराव गुरव, राहुल जाधव, पंकज पांढरपट्टे यांच्यासह विभागातील दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर नाक्यावर पोलीस चौकीची गरज
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाका शहराचे प्रवेशद्वार आहे. याठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच यापूर्वी याठिकाणी धूमस्टाईल चोरीसह अन्य गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथे पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या परिसरात दिवसेंदिवस अपघातही वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.
सुवर्णा कापूरकर यांना पुरस्कार
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील सरपंच सुवर्ण कृष्णत कापूरकर यांना ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव आदर्श सरपंच पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रेठरे बुद्रुकसारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सुवर्ण कापूरकर यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे समितीकडून सांगण्यात आले. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा कापूरकर यांनी गावाचा विकास साधला आहे.
महामार्ग परिसरात रसवंतीगृहात वाढ
कऱ्हाड : उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे कऱ्हाड-पाटण रस्त्यावर दुकानदारांनी अनेक ठिकाणी रसवंतीगृहे थाटली आहेत. वारुंजी, वसंतगड, साकुर्डी आदी मुख्य ठिकाणी रसवंती गृहासह थंड पेयांची दुकाने सुरू करण्यात आली असून, त्याठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
तळीरामांचा बंदोबस्त करण्याची गरज
कऱ्हाड : येथील बसस्थानक व भाजी मंडई परिसरात तळीरामांचा नागरिक व प्रवाशांना त्रास होत आहे. मद्यपी नाहक आरडाओरडा करतात. तसेच रस्त्यानजीक ते पडलेले असतात. त्यामुळे रस्त्यावरून चालत जाणेही मुश्किल होते. मुख्य चौकासह बसस्थानक परिसरात रात्रीच्यावेळी मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पाण्याचा अपव्यय टाळावा
कऱ्हाड : अनेक ठिकाणी पाणी आल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. दुकानांसमोर पाणी मारणे, वारंवार गाड्या धुणे अशाप्रकारे पाण्याची नासाडी केली जात असून, पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.