मोबाईल... हातात मावेना, खिसा पुरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:43 AM2021-08-12T04:43:58+5:302021-08-12T04:43:58+5:30

कऱ्हाड : महागड्या मोबाईलची लांबी, रुंदी जास्त असते; पण असे मोबाईल वापरणे सध्या ‘स्टेटस’चा विषय झाला आहे. लांबी, रुंदी ...

Mobile ... Mavena in hand, not enough pocket! | मोबाईल... हातात मावेना, खिसा पुरेना!

मोबाईल... हातात मावेना, खिसा पुरेना!

Next

कऱ्हाड : महागड्या मोबाईलची लांबी, रुंदी जास्त असते; पण असे मोबाईल वापरणे सध्या ‘स्टेटस’चा विषय झाला आहे. लांबी, रुंदी जास्त असलेले मोबाईल हातात मावत नाहीत, तसेच त्याला खिसा पुरत नाही. त्यामुळे काहीजण मोबाईल तासन्‌तास हातामध्येच ठेवतात. ज्याठिकाणी बसेल तेथेच ते मोबाईल ठेवतात. मात्र, हा बिनधास्तपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरतोय. बेजबाबदारीने ठेवलेला मोबाईल चोरटे हातोहात लंपास करीत असून कऱ्हाड शहरासह परिसरात अशा घटना वाढल्या आहेत.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल झाला. मोबाईल चोरीची घटना नवीन नसली तरी ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आणि ज्या पद्धतीने तो चोरला गेला ते चर्चेचे होते. कऱ्हाडच्या नायब तहसीलदारांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्याच हातातून तो मोबाईल चोरीस गेला होता. दुचाकीवरून प्रवास करताना धूम स्टाईल चोरट्याने चपळाईने मोबाईल चोरून पळ काढल्याचे तहसीलदारांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले होते. हातातील मोबाईल हिसकावण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आपला गहाळपणाही चोरट्यांना चोरीची आयती संधी देतो, याचेही प्रत्येकाने भान ठेवायला हवे. मोबाईल आपण सुरक्षित ठेवतो का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.

गर्दीच्या ठिकाणी वावरताना बहुतांशजण आपला मोबाईल हातात पकडतात. काहीजण शर्टच्या, पॅन्टच्या खिशात, तर काहीजण पर्स किंवा सॅकमध्ये कोंबतात. त्यांचा हा निष्काळजीपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरतो. बसस्थानकात तर अनेकजण बसल्या ठिकाणीच मोबाईल ठेवून एसटीकडे धावतात. मोबाईल हातात ठेवणाऱ्यांवरही चोरट्यांचे लक्ष असते. गहाळपणा होणार हे निश्चित असल्यामुळे चोरटे लक्ष ठेवून संधी साधतात. हातातील किंवा खिशातील मोबाईल बेमालूमपणे ते लंपास करतात आणि मोबाईल चोरीस गेल्याचे संबंधिताच्या लक्षात येईपर्यंत चोरटे तेथून पसार झालेले असतात.

- चौकट

पोलीस तपासात तांत्रिक अडचणी

चोरलेला मोबाईल चोरटे तातडीने बंद करतात. त्यातील सीमकार्ड काढून फेकून देतात. त्यानंतर त्याची कमी-अधिक किमतीत विक्री केली जाते. पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक घटना दाखल होतात. मात्र, चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अशा घटनांकडे पोलिसांकडून म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही.

- चौकट

कुठे असतो चोरीचा धोका?

१) बसस्थानक

२) महाविद्यालय

३) हॉटेल, रेस्टॉरंट

४) विवाह समारंभ

५) विविध कार्यक्रम

६) भाजी मंडई

७) आठवडा बाजार

८) गर्दीची इतर ठिकाणे

- चौकट

चोरीच्या घटना

कऱ्हाड शहर : ३३

कऱ्हाड ग्रामीण : २१

उंब्रज पो. स्टे. : १४

तळबीड पो. स्टे. : ८

- चौकट

किरकोळ किमतीत विक्री

महागडे मोबाईल चोरल्यानंतर ते अत्यंत कमी किमतीत विकले जात असल्याचे वेळोवेळी उघडकीस येते. ज्या मोबाईलची मूळ किंमत दहा ते पंधरा हजार रुपये आहे, असे मोबाईलही अगदी चार-पाच हजारांना विकले जातात.

- चौकट

आधी गडबड, नंतर पश्चाताप!

बसस्थानकात शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत बसलेले किंवा उभे राहिलेले असतात. महागडा व आकाराने मोठा असणारा मोबाईल त्यांच्या हातात असतो. एसटी आल्यावर मोबाईल शर्टच्या, पॅन्टच्या खिशात, पर्समध्ये, पिशवीत कुठेही टाकून तशीच एसटीकडे धाव घेतली जाते. एसटीत जागा पकडण्यासाठी वाट काढताना सहजपणे चोरटे आपला डाव साधतात. त्यानंतर मोबाईलधारकावर पश्चातापाची वेळ येते.

- चौकट

... होऊ शकतो गैरवापर

मोबाईल चोरीस गेल्यावर त्यातील फोटो, व्हिडिओ तसेच अन्य ‘डाटा’ चोराच्या हाताला लागतो. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. चोरीस गेलेल्या मोबाईलचा वापर करून मोठा गुन्हा केला जाऊ शकतो. त्यामुळे मोबाईल चोरीस गेल्यास तातडीने त्याची पोलीस ठाण्यात तक्रार देणे गरजेचे आहे.

- चौकट

चोरी नको, ‘गहाळ’ झाला म्हणा!

मोबाईल चोरीस गेल्यानंतर काहीजण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात. काहीवेळा पोलीस रीतसर चोरीची तक्रार नोंदवून घेतात. मात्र, फक्त मोबाईलच चोरीला गेला असेल तर पोलिसांकडून त्याला जास्त महत्त्व दिले जात नाही. चोरीची तक्रार घेण्याऐवजी अनेकवेळा पोलीस गहाळ रजिस्टरला नोंद करून तक्रारदाराला दाखला देतात.

फोटो : १०केआरडी०२

कॅप्शन : कर्मवीर भाऊराव पाटील चौक

फोटो : १०केआरडी०३

कॅप्शन : बसस्थानक परिसर

फोटो : १०केआरडी०४

कॅप्शन : बसस्थानक फलाट

फोटो : १०केआरडी०५

कॅप्शन : उपजिल्हा रुग्णालय परिसर

फोटो : १०केआरडी०६

कॅप्शन : वारूंजी फाटा

फोटो : १०केआरडी०७

कॅप्शन : शाहू चौक परिसर

Web Title: Mobile ... Mavena in hand, not enough pocket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.