सराईत चोरट्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 02:56 PM2020-03-19T14:56:48+5:302020-03-19T14:58:04+5:30
सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा : शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
आकीब गुलाब शेख (वय ३०, रा. बुधवार नाका, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रोशन हिंदूराव बर्गे (वय १८, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) याचा मोबाईल १६ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास बसस्थानक परिसरातून चोरीस गेला होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यानंतर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी याचा तपास सुरू केल्यानंतर चोरीस गेलेला मोबाईल आकीब शेखने चोरल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे.
शेख हा सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केली.