खिशात मोबाइल ‘स्मार्ट’ पण नंबरच नाही पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:06+5:302021-07-03T04:24:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : हातात आलेल्या मोबाइलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं, असं म्हणतात. अलीकडे मात्र हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : हातात आलेल्या मोबाइलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं, असं म्हणतात. अलीकडे मात्र हा मोबाइल आपला मेंदूही गिळंकृत करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेकांना स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मोबाइलही हल्ली जीवनावश्यक गरज बनून राहिली आहे. घरातून बाहेर पडताना मोबाइलची साथ इतकी सवयीची झाली आहे की, अनेक जणांनी मोबाइल कव्हरची पर्स केली आहे. गरजेच्या वेळी सोबत पर्स नसली, तरीही मोबाइल कव्हरच्या मागे असलेले पैसे संकटमोचक म्हणून काम करतात.
गेल्या काही दिवसांत कोणीही भेटलं किंवा नवीन ओळख झाली की, त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय जडली आहे. कोणाला फोन करायचं म्हटलं, तर नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याच्या सवयीने अनेकांना स्वत:च्या दुसऱ्या नंबरसह कुटुंबीयांचेही नंबर पाठ नसल्याचे पुढं आले आहे.
चौकट :
१. स्वत:चा दुसरा नंबरही नाही पाठ
बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश मोबाइल हे डबल सिमचे आहेत. एका कार्डला रेंज नसेल, तर दुसऱ्याला रेंज मिळेल, या शक्यतेने अनेकांकडे दोन कार्ड आहेत. बहुतांश लोकांना आपल्या स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाइलमध्ये नंबर शोधून तो डायल करण्याची सवय लागल्याने नंबर पाठ करण्याचा प्रश्न नाही. दुसरं म्हणजे स्वत:च स्वत:ला फोन करत नाही.
२. नंबर लक्षात ठेवण्यात ज्येष्ठ मंडळी आघाडीवर
तरुणाईच्या तुलनेत फोन नंबर लक्षात ठेवण्यात ज्येष्ठ आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पूर्वीपासून घरात साधा फोन वापरण्याची सवय असल्याने, त्यांच्या मेंदूला हे नंबर पाठ करण्याची सवय लागली आहे. घरातच असल्याने त्यांच्याकडे कुटुंबीयांनी नाकारलेला फोन येतो. घाई गडबडीत त्याचे चार्जिंग नित्यनियमाने होईल, याची खात्री त्यांना नसते. म्हणून डायरीमध्ये आणि कॅलेंडरवर त्या नंबर लिहितात. त्यातून पाहून नंबर डायल करण्याची सवय लागल्याने, त्यांना अन्य कुटुंबीयांच्या तुलनेत सर्वाधिक नंबर पाठ असतात.
३. असं करा नंबरचे पाठांतर!
कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची प्रत्येकाची स्वतंत्र पद्धती आहे. दहा अंकी नंबरमधून काहींना दोन-दोन अंक लक्षात ठेऊन पूर्ण नंबर पाठ होऊ शकतो. काही जण मात्र, पहिले आणि नंतरचे पाच आकडे ध्यानात ठेवून फोन नंबर पाठ करतात. अनेकांना नंबर पाठ करण्यापेक्षा तो वारंवार डायल केल्यानंतर लक्षात राहतो.
कोणाचे नंबर असतात पाठ
पालक : ३३
मित्र : २७
नातेवाईक : १३
सहकारी : १६
शेजारी : ७
इतर : ४
कोट :
तुमच्या हातात कितीही आधुनिक गॅझेट असले, तरीही ते डिस्चार्ज झाले, तर आपली अडचण होऊ नये, यासाठी किमान पाच नंबर आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. यात कुटुंबीय, मित्र, व्यावसायिक सहकारी यांच्यासह शेजारी राहणाऱ्यांच्या क्रमांकाचा समावेश असावा.
- संतोष शेडगे, मोबाइल व्यावसायिक