पोलीस वसाहती होणार आधुनिक
By Admin | Published: March 11, 2015 11:07 PM2015-03-11T23:07:30+5:302015-03-12T00:03:22+5:30
‘लोकमत’चा प्रभाव : महाबळेश्वरमधील कर्मचाऱ्यांमधून समाधान
अजित जाधव - महाबळेश्वर महाबळेश्वर येथील पोलीस वसाहतीचे लवकरच आधुनिकीकरण होणार असून त्यामुळे पोलिसांना आता चांगली घरे आणि सुविधा मिळणार आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा फळास आल्याची प्रतिक्रीया पोलिसांनी यानिमित्ताने व्यक्त केली.येथील पोलीस वसाहतीची अत्यंत दुर्दशा झाली होती. वसाहतीच्या आजूबाजुने झाडेझुडपे वाढली होती. छताची अवस्था आणि तेथील सुखसोयी बद्दल लोकमतने वारंवार प्रकाश टाकून पोलिसांची बिकट समस्या समोर आणली होती.त्यानंतर बांधकाम विभागाने पोलिसांच्या मदतीने या पोलीस वसाहती अत्याधुनिक व सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनाही आता अच्छे दिन येणार आहेत. महाबळेश्वर येथे ब्रिटिश काळापासूनची लाल,जांभ्या दगडात बांधकाम केलेल्या पोलीस वसाहतीच्या तीन चाळी आहेत. त्यात ४२ खोल्या असून, सुमारे ४२ पोलीस कुटुंबांची राहण्याची सोय होती.मात्र गेले कित्येक वर्षे या वसाहतीतील खोल्यांकडे ना पोलीस खात्याने ना सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे म्हणावेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे गेले अनेक वर्षे या वसाहतीची अत्यंत दुर्दशा झालेल्या अवस्थेत आहेत. चाळीतील सर्वच खोल्यांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेले असून, जेथे पूर्वी पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबीयासह आनंदाने राहायचे व आपले कर्तव्य पार पाडायचे त्याच वसाहतीमधून आता सरपटणारे भयावह प्राणी, मोठ-मोठ्या घुशी, उंदरे राहत आहेत. या वसाहतीची ही गंभीर व भयावह अवस्था गेले अनेक वर्षांपासून झाले असून, यामुळे येथे कामास आलेल्या व विविध हंगामात बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. पोलिसांना स्वत:ची हक्काची जागाच नसल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते.
वसाहतीसाठी दीड कोटीचा निधी
‘लोकमत’च्या वृत्तानंतर पोलीस खात्याचे वरिष्ठ व सार्वजनिक खात्याच्या वरिष्ठांनी तातडीने या वसाहतीची पाहणी करून प्रस्ताव व इस्टिमेट करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. राज्य शासनाने तो त्वरित मंजूर करून त्यासाठी लागणारा सुमारे दीड कोटींचा निधीसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला. या घटनेस सुमारे तीन वर्षे झाले तरी सार्वजनिक बांधकाम खाते गप्पच होते. याबाबत लोकमतने आवाज उठवून निद्रिस्त व सुस्त खात्याची झोप उडविली होती. यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन सध्या या पोलीस वसाहतीच्या बांधकामासाठी अखेर हालचाली सुरू केल्या.