आपत्ती मोदी निर्मित!

By admin | Published: December 26, 2016 11:52 PM2016-12-26T23:52:48+5:302016-12-26T23:52:48+5:30

पृथ्वीराज चव्हाण : नोटाबंदीच्या विरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

Modi made the disaster! | आपत्ती मोदी निर्मित!

आपत्ती मोदी निर्मित!

Next

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर तो सर्व विचार करूनच घेतला असेल, अशी अपेक्षा ठेवून काँगे्रसने या निर्णयाला पाठिंबा दिला होता, पण सरकारने नोटाबंदी करताना कोणतीच पूर्वतयारी केली नव्हती, हे आता स्पष्ट झाले असून, ४८ दिवसांपासून संपूर्ण भारतीय जनतेला मोदींनी वेठीस धरल्याचे पुढे आले आहे. नोटाबंदी ही मोदी निर्मित आपत्ती आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आ. चव्हाण म्हणाले, ‘८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली. पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटा रोखायच्या, आतंकवाद संपवायचा, काळा पैसा बाहेर काढायचा, भ्रष्टाचारविरोधातील व्यापक मोहीम पुढे न्यायची, असे पंतप्रधानांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण करताना सांगितले होते. देशाचे व्यापक हीत लक्षात घेऊन काँगे्रसने त्यांच्या निर्णयाला ९ नोव्हेंबर रोजी पाठिंबा दर्शविला. मात्र, सरकारचा हेतू साफ नसल्याचे पुढे आल्याने काँगे्रसने सरकारचा निषेध करणे सुरू केले आहे.’ सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. त्याचवेळी ८६.४ टक्के चलन बाद झाले. मात्र, ते बाद ठरवित असताना कोणतीही पूर्वतयारी केली नाही. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी पाचशे रुपयांचे चलन बंद करण्याला विरोध दर्शविला होता, त्यामुळे त्यांना बाजूला करून ऊर्जित पटेल यांना मोदी सरकारने आणून बसविले. डायनिंग टेबलचे पाच पाय काढून एका पायावर त्याला उभे करावे, अशी अवस्था मोदींनी हटवादीपणे देशाच्या अर्थव्यवस्थेची करून ठेवली. शरीरातलं ८६ टक्के रक्त काढल्यानंतर जे होते, तीच परिस्थिती सध्या अर्थव्यवस्थेची होऊन बसली आहे,’अशी टीकाही आ. चव्हाण यांनी यावेळी केली. काँग्रेसने पूर्ण पुराव्यानिशी सहारा, बिर्ला गु्रपने मोदी यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप केला होता; पण यापैकी एकाही आरोपाचे खंडण मोदींनी केले नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही नोटाबंदीचा निर्णय होणार आहे, याची सूतराम कल्पना नव्हती, एखाद्या हुकूमशहाप्रमाणे मोदींनी हा निर्णय जाहीर करून टाकला. एटीएमवर रात्री अपरात्रीपर्यंत पैसे काढण्यासाठी लोकांना ताटकळत ठेवले. अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात पाचशे कोटी रुपये जमा झाले. या बँकेचे भाजप अध्यक्ष अमित शहा संचालक आहेत. ज्या लोकांकडे नव्या नोटा सापडल्या तेही भाजपशी संबंधित लोक आहेत. या निर्णयाचे गौडबंगाल जनतेपुढे येण्यासाठी संसदीय समिती नेमून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील मेट्रोला मी मुख्यमंत्री असताना ११ फेब्रुवारी २०१४ रोजी एकाच दिवशी मान्यता दिली होती. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक लागली. आमचे सरकार सत्तेपासून दूर गेले. मात्र, मे २०१४ पासून या प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपने जाणीवपूर्वक रखडवले. पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भूमिपूजनाचा सरकार खटाटोप करत असल्यानेच मी स्वत: काँगे्रसच्या वतीने या प्रकल्पाचे भूमिपूजन केले, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मोदींच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची अक्षरश: होरपळ सुरू आहे. साधा धनादेश लिहिता येत नाही, असे असंख्य लोक भारतात आहेत. नोटाबंदीचा निर्णय अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर मोदींनी कॅशलेस व्यवहार करण्याचा सल्ला देणे सुरू केले आहे. यावेळी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, पक्षनिरीक्षक अभय छाजेड, तोफिक मुलाणी, शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग यांची उपस्थिती होती. लोकांना शॉक देण्याचा मोदींचा हेतू ‘तत्कालीन गव्हर्नर रघुराम जी राजन यांनी पाचशे रुपयांचे चलन न बंद करण्याचे सांगितले होते; पण पाचशेच्या नोटेला हात घालून लोकांना शॉक द्यायचा आहे, असे स्पष्टीकरण मोदी यांनी त्यावेळी केले होते,’ असेही आ. चव्हाण यांनी सांगितले. मोदींविरोधात निदर्शने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून सामान्य जनतेला वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत आ.पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, राहुल घाडगे, रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँगे्रस कमिटीबाहेर निदर्शने केली. शिंदे खोटे बोलतात साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुम्ही होऊ दिले नाही, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे, या प्रश्नावर बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘साताऱ्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावाला मी मंजुरी दिली होती. मी खावली, ता. सातारा येथील शासनाची जागा या महाविद्यालयासाठी निवडली होती. परंतु कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध करुन देता येईल, असे तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी वचन दिले. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यात जलसंपदा खात्याला इमारत बांधून देण्याचे प्रस्तावित नव्हते. तो खर्च करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्यामुळेच हा प्रस्ताव थांबला, मात्र शिंदे सरसरळ खोटे बोलत आहे,’ अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Web Title: Modi made the disaster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.