मोहनराव कदम हेच काँगे्रसकडून उमेदवार
By admin | Published: October 21, 2016 01:14 AM2016-10-21T01:14:14+5:302016-10-21T01:14:14+5:30
विधान परिषद निवडणूक : सातारा-सांगलीत वर्चस्व सिद्ध करण्याचा आनंदराव पाटील यांचा दावा
सातारा : राष्ट्रवादीसोबत आघाडी करून काँगे्रसला मोठा फटका बसला आहे. विशेषत: सातारा-सांगली जिल्ह्यांमध्ये काँगे्रसचा हात धरून राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर आला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने काँगे्रसला दगा दिला. आता विधान परिषदेला काँगे्रसतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोहनराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘सातारा-सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँगे्रसचे संख्याबळ चांगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँगे्रस आपली ताकद दाखवून देईल. मोहनराव कदम हे काँगे्रसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी १९७८ पासून काँगे्रसला बळकटी देण्याचे काम केले असल्याने त्यांच्या नावावर काँगे्रसतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.’
विधान परिषदेसह सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँगे्रस स्वबळावर लढणार असल्याचेही आमदार आनंदराव पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. काँगे्रस भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा पक्षनिरीक्षक तोफिक मुलाणी, जिल्हा परिषदेतील माजी पक्षप्रतोद अॅड. विजयराव कणसे, प्रदेश चिटणीस रजनी पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग, युवकचे सरचिटणीस उमेश ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.