माढ्यात मोहिते-पाटील यांच्या गावभेटी; भाजप नाराजी दूर कधी करणार?

By नितीन काळेल | Published: March 21, 2024 07:32 PM2024-03-21T19:32:37+5:302024-03-21T19:34:13+5:30

अनपेक्षित घडामोडी : महादेव जानकर यांनी फलटणला राजे बंधुंची घेतली भेट; राजकीय अर्थ दडला.

mohite patil village visits in madha when will bjp remove the resentment | माढ्यात मोहिते-पाटील यांच्या गावभेटी; भाजप नाराजी दूर कधी करणार?

माढ्यात मोहिते-पाटील यांच्या गावभेटी; भाजप नाराजी दूर कधी करणार?

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : भाजपने माढ्यासाठी खासदार रणजितसिंह यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याने दुखावलेले गेलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी अजुनही दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावभेटीवर जोर दिला आहे. तर रासपचे महादेव जानकर यांनीही संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. यामागेही राजकीय अर`थ दडल्याने माढ्यात अनपेक्षीतही घडामोडी सुरू असल्याचेही स्पष्ट झालेले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून ही चाैथी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पण, या निवडणुकीने महाविकास आघाडी आणि महायुतीतही वादळ उठवलेले आहे. यात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. पण, याचा आनंद भाजपमध्ये तसेच युतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाही झालेला नाही. कारण, उमेदवारी जाहीर झाल्यापासून फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उठाव केला. तर अकलुजचे मोहिते-पाटीलही खुश नाहीत. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनाही माढ्याची उमेदवारी हवी होती. पण, पक्षाने त्यांना दूरच ठेवले. त्यामुळे मोहिते-पाटीलही या उमेदवारीवर नाराज आहेत. चार दिवसांपूर्वीच रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील तसेच मतदारसंघातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत अकलुजला जोरदार राजीकय खलबते झाली. त्यामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही अकलुजला येऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा लागला. तरीही यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मोहिते यांची नाराजी काय ? त्यांना कसे राजी करता येईल हे पहावे लागणार आहे. अशातच धैर्यशील माेहिते यांनी मतदारसंघात गावभेटीवर जोर दिलेला आहे. दररोज एकएेका विधानसभा मतदारसंघात जाऊन ते राजकीय चाचपणी करत आहेत. त्यामुळे भाजपपुढील टेन्शन वाढत चालले आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचा पर्याय समोर ठेवला होता. तसेच ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही ते संधान साधून होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांची पवार यांच्याबरोबर भेटही झाली होती. त्यामुळे धैर्यशील मोहिते यांची सध्याची गावभेट ही महाविकास आघाडीकडील तरी वाटचाल नाही ना अशी शंका येण्यास वाव आहे. त्यातच चार दिवसांपूर्वीच अकलूज भेटीत रामराजे आणि मोहिते-पाटील यांच्यातील चर्चेत खासदार रणजितसिंह यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीचा पर्यायही समोर आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी कोणालाही मिळो पण, निवडणूक लढवायची असा निर्धारही त्यावेळी केल्याचे समोर आले होते. यामुळेच सध्या माढ्यातील राजकारण आणखी वळण घेताना दिसून येत आहे.

जानकर यांच्या मनात काय ?

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे सातारा जिल्ह्यातीच. त्यांना माढ्यातून निवडणूक लढवायची आहे. स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा त्यांनी फलटणमध्येच केली होती. पण, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर माढ्यासाठी भेट घेतली. त्यातून त्यांना अजूनतरी हिरवा कंदील मिळालेला नाही. अशातच त्यांनी गुरुवारी सकाळीच फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नक्कीच होती. यात राजकीयच अऱ्थ दडलेला आहे. तरीही जानकर यांना निवडणूक लढवायची आहे, तसेच संजीवराजेही तयारीत आहेत. संजीवराजेंसाठी अजून पत्ता ओपन झालेला नाही. तरीही उमेदवार कोणीही असू द्या एेकमेकाला साथ देऊया, असे या चर्चेत ठरल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे माढ्याचे रणांगण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे .

 

Web Title: mohite patil village visits in madha when will bjp remove the resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.