झाडाच्या जगण्याला मिळाला ओलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:21+5:302021-02-05T09:07:21+5:30
साताऱ्यातील माचीपेठेतील एका आंब्याच्या झाडाची मुळे उघडी पडल्याने या झाडाची जगण्यासाठी धडपड सुरू होती. ‘मलाही जगायचंय...’ अशी आर्त हाक ...
साताऱ्यातील माचीपेठेतील एका आंब्याच्या झाडाची मुळे उघडी पडल्याने या झाडाची जगण्यासाठी धडपड सुरू होती. ‘मलाही जगायचंय...’ अशी आर्त हाक हे झाड देत होते. या झाडाच्या सभोवताली भिंत बांधण्यात आल्यामुळे झाडाला जगण्यासाठी एक प्रकारे ऊर्जा मिळाली आहे. (छाया : जावेद खान) २९सातारा-ट्री
०००००००
दप्तर खरेदीसाठी गर्दी
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मार्चपासून मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यांनी गणवेश, दप्तर, शूजही खरेदी केलेले नाहीत. शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
००००००
हेल्मेट सक्तीची गरज
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला आहे. वाहतुकीचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यापासून बचाव करण्यासाठी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
००००
द्राक्षे बाजारात दाखल
सातारा : साताऱ्याचा आठवडा बाजार रविवारी भरतो. या बाजारात द्राक्षांची आवक होऊ लागली आहे. सध्या दर तेजीत असले तरी द्राक्षांना सातारकरांमधून मागणी वाढत आहे. पिवळी व काळी अशी दोन्ही प्रकारची द्राक्षे महात्मा फुले बाजार समितीत आली आहेत.
२९ग्रेप्स
०००००००००
बिबट्याचा वावर
सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील यवतेश्वर घाट व पायथ्याला काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. याबाबत साताऱ्यातील नागरिकांमध्ये चर्चा वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. अंधार असताना जाण्याऐवजी उजेडल्यानंतर जाण्याचे आवाहन केले जात आहे.
००००००००००
वाहनतळ गैरसोय
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी आठवडा बाजार भरतो. यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी कृषी माल विक्रीसाठी घेऊन येतात. ताज्या व चांगल्या भाज्या मिळत असल्याने हजारो सातारकर या मंडईत येत असतात. पण काही वाहनचालक मंडईच्या गेटच्या आतमध्ये दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
००००००
साताऱ्याच्या तोंडावर मास्क लागले निघायला
सातारा : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने तोंडावर मास्क लावण्याची सक्ती केली. त्याला सातारकरांनी सुरुवातीला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आता कोरोनाची धास्ती कमी होत असल्याने मास्क वापरण्याचे टाळले जात आहे. भरचौकात अनेकजण विनामास्क फिरताना दिसतात.
-------------
मांढरदेवला शांतता
वाई : मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला राज्यभरातून भाविक येत असतात. सलग तीन दिवस ही यात्रा फुललेली असते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने यात्रा रद्द करावी लागली. त्यामुळे यंदा प्रथमच कधी नव्हे एवढी शांतता या मार्गावर अनुभवायला मिळत आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत.
००००
श्वानांचा उपद्रव
सातारा : सातारा शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. राजपथ, खालचा रस्ता, जुना मोटार स्टॅण्ड परिसरात श्वान झुंडीने फिरत असतात. रात्री दुचाकीस्वारांचा ते पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
००००००
लांबपल्ल्याच्या गाड्या
सातारा : राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देशलाही गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होत आहे. या गाड्या अशाच सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
००००००
तळीरामांमुळे त्रास
सातारा : सातारा परिसरात असलेल्या डोंगररांगा, जंगलात तळीरामांनी अड्डा केला असून, त्याठिकाणी बसून अनेक तास मद्यपान केले जाते. तसेच काहीवेळेस रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा गोंधळ सुरू असतो. रात्री शांतता असल्याने तो लांबपर्यंत ऐकू येत असतो.
०००००००
पाणीसाठे आटले
सातारा : जिल्ह्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने पाणी चांगले असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अनेक नदी, ओढ्यांचे पाणी आटले आहेत. भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
००००००
शाळा सुरू झाल्या पण स्कूल बस बंदच
सातारा : जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांना दिलासा मिळेल, असे वातावरण झाले होते. मात्र, अनेक शाळांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी एक दिवसाआड शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिन्यात केवळ पंधरा दिवसच शाळा असल्याने पालक स्कूल बसऐवजी पाल्याला स्वत:च सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
०००००
आठवडा बाजार सुरू
सातारा : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील आठवडा बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आला होता. तो आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, बाजारात येणारे शेतकरी व ग्राहकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे.
०००००००००
व्यवसाय पूर्वपदावर
सातारा : कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांचे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसायांना फटका बसला होता. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी, कामगारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महामाई कायम असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
०००००००
ग्रेड सेपरेटरमध्ये लगेच काम सुरू
सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावर नव्याने झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गातील अनेक कामे सुरूच असून, टप्प्याटप्प्याने ती केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी खोदकाम केले होते. आता कोठे रस्ता झाला नाही तोच खोदकाम सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, हे काम राहिलेले असल्याने ते केले जात आहे. मात्र, यापुढे उरलेली कामे तातडीने मार्गे लावावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
०००००००
फोटो २९बामणोली-वणवा
वनसंपदा वाचविण्यासाठी जिवाची बाजी...!
जागतिक वारसास्थळ कास पठारावर काही लोकांनी बुधवारी वणवा लावला होता. परंतु, पठारावरील वन कर्मचारी प्रदीप शिंदे, चेतन आटाळे, सुजित जांभळे व विजय बादापुरे यांनी अथक् परिश्रम घेत हा वणवा विझवला. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वणव्यावर नियंत्रण मिळवले. (छाया : लक्ष्मण गोरे)