मोकाट श्वानांमुळे दुचाकीस्वारांचा जीव मुठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:48+5:302021-02-15T04:34:48+5:30
दुचाकी चालवत असताना एखादे श्वान आडवे आले की काय होते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. एरव्ही भरधाव दुचाकी चालविणारेही ...
दुचाकी चालवत असताना एखादे श्वान आडवे आले की काय होते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. एरव्ही भरधाव दुचाकी चालविणारेही श्वान दिसताच वेग कमी करतात. सध्या कऱ्हाड- पाटण मार्गावर पाटण तिकाटणे येथे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे रात्री मोकाट श्वानांची एवढी दहशत वाढली आहे की, पाटणकडे जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे.
वारुंजी फाटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पाटण तिकाटणे परिसरात कऱ्हाडहून वारुंजीकडे जाणाऱ्या उपमार्गावर वळणावरच मोठा गतिरोधक आहे. येथे चारचाकीसह दुचाकी वाहनांचा वेग कमी होतो. गतिरोधकालगतच निर्माण झालेल्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात दहा ते वीस मोकाट श्वान असतात. वाहनांची गती कमी झाल्यास काही श्वान दुचाकीस्वारांवर अचानक हल्लाही करत आहेत.
- चौकट
उड्डाण पुलाखाली वावर
पाटण तिकाटणे येथे रस्त्यालगत टाकलेले शिळे अन्न, प्राण्यांच्या मांसावर बिनधास्तपणे हे श्वान ताव मारत आहेत. येथेच असलेल्या उड्डाण पुलाखाली रात्री श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणात दिसते. अंधार असल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना श्वान दिसत नाही. श्वान अचानक समोर आल्यास अपघात होतात.