गुंड लल्लन जाधवसह गॅंगमधील १६ जणांना मोक्का, पोलिस महानिरीक्षकांची कारवाई
By दत्ता यादव | Published: April 23, 2024 08:43 PM2024-04-23T20:43:41+5:302024-04-23T20:44:12+5:30
आधी घरे जमीनदोस्त, आता कारागृहात मुक्काम
सातारा: जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी प्रतापसिंह नगरातील गुंडांची ११ घरे जमीनदोस्त केली होती. मात्र, आता याच गुंडांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये गुंड लल्लन जाधव (वय २८) याच्यासह १६ जणांचा समावेश आहे. या कारवाईचे सातारकरांधून समाधान व्यक्त होत आहे.
टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव, राजू ऊर्फ बंटी नवनाथ लोमटे, ओंकार भारत देढे, विकास रमेश खुडे, ऋत्विक ऊर्फ रोहित लक्ष्मण उकिर्डे, मधुरमा दत्तात्रय जाधव, अनिता दत्तात्रय जाधव, दत्तात्रय ऊर्फ गदऱ्या काशिनाथउकिर्डे, सागर रामा खुडे, विजय ऊर्फ बबल्या जाधव, पमी ऊर्फ पमीता दत्तात्रय बोराटे ऊर्फ जाधव, सुनीता दत्तात्रय जाधव (सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा), अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या ‘लल्लन गॅंग’च्या टोळीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, महिनाभरापूर्वी प्रतापसिंहनगरातील एका तरुणीच्या घरी रात्रीच्या सुमारास गुंड लल्लन जाधव हा व त्याचे आठ ते दहा साथीदार गेले. त्या तरुणीच्या घरातील साहित्याची तोडफोड करून मी प्रतापसिंहनगरातील दादा आहे.
माझ्या नादाला लागला तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत तरुणीला तलवारीने भाेसकलेहोते. या संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली होती. एवढ्यावरच न थांबता लल्लन गॅंगच्या टोळीने रस्त्याच्याकडेला उभी असलेली दहा वाहनांची तलवार, लाकडी दांडक्याने तोडफोड केली होती. या प्रकारानंतर साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली होती. लल्लन गॅंगवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांमधून केली जात होती. दरम्यान, या घटनेनंतर आठवडाभरात जिल्हा प्रशासनाने रातोरात सूत्रे हलवून प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव, त्याचा मुलगा लल्लन जाधव, भाऊ युवराज जाधव यांच्यासह तब्बल ११ घरे, इमारती जमीनदोस्त केल्या.
या कारवाईनंतरही जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी या टोळीला कायमची अद्दल घडविण्यासाठी लल्लन गॅंगमधील टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला. हा प्रस्ताव फुलारी यांनी मंजूर करून लल्लन व त्याच्या गॅंगमधील १६ जणांना मंगळवारी मोक्का लावला. त्यामुळे या टोळीला किमान पाच वर्षे तरी कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे.
हे आहेत गुन्हे..
लल्लन गॅंगवर खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करणे, जबर दुखापतीसह दरोडा टाकणे, घरफोडी, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे, अत्याचार करणे, जबर दुखापत, अपहरण आदी गुन्हे दाखल आहेत.
लल्लनचे अख्खे कुटुंबच कारागृहात
लल्लन जाधव, त्याची बहीण, आई, चुलत भाऊ, दोन सावत्र आई, मामा अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबच कारागृहात जाणार आहे. यापूर्वी लल्लनचे वडील दत्ता जाधव आणि चुलता युवराज जाधव हे सुद्धा कारागृहातच आहेत.