सातारा पालिकेच्या सभेला वर्षभरानंतर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:37+5:302021-01-23T04:39:37+5:30
सातारा : तब्बल वर्षभरानंतर सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाल्याने विकासाची गाडी गतीमान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बुधवार, ...
सातारा : तब्बल वर्षभरानंतर सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाल्याने विकासाची गाडी गतीमान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बुधवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी शासन आदेशानुसार ही सभा ऑनलाईन होणार असून, अजेंड्यावर शहर विकासाचे ४२ विषय घेण्यात आले आहेत.
पालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊमुळे सभा, बैठकांवर राज्य शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे निर्बंधही उठविण्यात आले. मात्र, पालिकेच्या सभेला मुहूर्तच मिळत नव्हता. अखेर वर्षभरानंतर का होईना सभेची तारीख जाहीर झाल्याने नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला. नगरविकास विभागाने सदस्यांच्या उपस्थितीत सभा घ्यावी, असे आदेश पालिकांंना दिलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने दि. ३ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सभा बोलविली आहे. सभेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत, याची खबरदारी घेण्याचे कामही आता सुरू झाले आहे.
सभेच्या अजेंड्यावर यंदा शहर विकासाचे ४२ विषय घेण्यात आले आहेत. यामध्ये हद्दवाढीतील ग्रामपंचायतींमधून जमा होणारा महसूल ग्रामपंचायत हद्दीत खर्च करणे, ग्रेड सेपरेटरला महापुरुषांचे नाव देणे, अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर विद्युतीकरण करणे, लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, बांधकाम विभागातील विकासकामांना मुदतवाढ देणे, सातारा शहर व हद्दीतील खुल्या जागा, रस्ता, दुभाजक यांचे सुशोभिकरण करणे, सोनगाव डेपोत मैल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे, व्यावसायिक घरपट्टीत तीन महिने सूट देणे आदी विषयांचा समावेश आहे.