तब्बल दहा तास ऐंशी हातांनी मोजले पैसे
By Admin | Published: July 1, 2015 09:27 PM2015-07-01T21:27:42+5:302015-07-02T00:27:13+5:30
क्षेत्र महाबळेश्वर : एप्रिल ते जूनअखेर दानशूरांनी दिली दहा लाखांची भेट; परदेशी चलनाचाही समावेश
महाबळेश्वर : हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे अन् दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम दान केली आहे. एप्रिल ते जून या महिन्यांत क्षेत्रमहाबळेश्वरला भेट दिलेल्या भाविक, पर्यटकांनी दान केलेली ही रक्कम असून यामध्ये परदेशी चलनाचाही समावेश आहे, चाळीस नागरिकांनी दहा तासाच ही रक्कम मोजली. अशी माहिती तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी दिली.
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सुमारे पंधरा ते सोळा लाख पर्यटक भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घेतात. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर अंतरावर क्षेत्रमहाबळेश्वर हे पौराणिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्यांचा उगम याठिकाणी झाला आहे. याच ठिकाणी महाबळ व अतिबळ या दैत्यांची हेमाडपंथी मंदिरे आहेत. याठिकाणी शंभूमहादेवांनी दैत्यांचा पराभव केला, येथे शंभूमहादेवाचा वास आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
मंदिराच्या देखभालीसाठी राज्य शासनाचा ट्रस्ट आहे. जिल्हा न्यायाधीश ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असून प्रांत, तहसीलदार, नगराध्यक्ष व सरकारी वकील हे संचालक आहेत. क्षेत्रमहाबळेश्वर मंदिरातील दानपेटी दर तीन महिन्यांनी उघडली जाते. एप्रिल ते जूनअखेर दानपेटी व अभिषेक देणगीरूपाने ट्रस्टला १० लाख १० हजार ५१ रुपये मिळाले आहेत, अशी माहिती तहसीलदार म्हेत्रे यांनी दिली. दानपेटीतील रक्कम तहसीलदार कार्यालयात आणून ४० लोकांकडून मोजण्यात आली. दानपेटीत जमा झालेल्या रकमेत धीरम, युरो आदी परदेशी चलनांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)
वाहनतळाचेही ट्रस्टला उत्पन्न
क्षेत्रमहाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या माध्यमातूनही मोठे उत्पन्न ट्रस्टला मिळते. यातून मंदिर परिसर व गावात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरांची गळती काढण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सहा लाख रुपये खर्च केले आहेत.
मंदिरांना दिले मूळ रूप
क्षेत्रमहाबळेश्वर मंदिरात सुशोभीकरणाच्या नावाखाली बसविण्यात आलेल्या आकर्षक फरशी काढून मंदिराला मूळ रूप देण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर अतिशय भव्य व मनमोहक दिसत आहे.