पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतायत पैसे

By admin | Published: April 20, 2017 10:39 PM2017-04-20T22:39:12+5:302017-04-20T22:39:12+5:30

विद्यानगरी बनली टंचाईनगरी : कृष्णा नदीकाठावरील स्थिती; पाणी पातळी खालावल्याने नागरिक त्रस्त

Money to pay for drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतायत पैसे

पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतायत पैसे

Next



विद्यानगर : उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. कधी ३८ तर कधी ४० अंशांपर्यंत तापमान वाढत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. अशात विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यानगरीत सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामामुळे विद्यानगरी सध्या पाणीटंचाई नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
शहरालगतची आणि कृष्णा काठावरील झपाट्याने विकसित होणारी नागरीवस्ती म्हणून विद्यानगरीचा लौकीक आहे. यावर्षी कडक उन्हाळ्यामुळे या परिसरातील कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तर पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील अपार्टमेंटला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी जादा पैसे देऊन येथील नागरिकांना टँकरने पाणी आणावे लागत आहे.
शांत व रम्य परिसर तसेच सर्व शैक्षणिक सुविधा जवळ असल्याने विद्यानगरचे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. दीडशेपेक्षा जास्त अपार्टमेंट या ठिकाणी सध्या असून, पाच वसतिगृहांची संख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या जास्त आहे. या सर्वांचा ताण ग्रामपंचायतीवर पडत आहे. ग्रामपंचायत आपल्यापरिने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करीत आहे. पण या भागातील रोजची वाढती लोकसंख्या व वाढते पाणी वापराचे प्रमाण यामुळे पाणी कमी पडत आहे.
अनेक अपार्टमेंट व इमारतींमध्ये पाणी पुनर्भरणाची कोणतीच सोय नसल्याने तसेच पाणी साठवण्याबाबत उपाययोजना उभारण्यात आल्या नसल्यामुळे पाणी शिल्लक राहत नाही. या कारणामुळे या ठिकाणी नेहमीच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. सध्या एप्रिल महिना असल्याने मे व जून महिन्यांच्या पाणीटंचाईच्या झळा या एप्रिल महिन्यातच शहरवासीयांना सोसाव्या लागत आहेत.
या ठिकाणी असलेल्या वसतिगृह आणि अनेक अपार्टमेंटच्या इमारतीवरही विद्यार्थी राहतात. एका खोलीत पाच ते सहा विद्यार्थी भाडेतत्त्वावर राहत असल्याने एका खोलीसाठी २५० लिटर पाणी वापरले जाते. ३० ते ४० कुटुंबे वास्तव्यास असणारी अनेक अपार्टमेंटस् येथे मोठ्या संख्येने असल्याने पाण्याची प्रचंड मागणी असते. सैदापूर ग्रामपंचायतीची चोवीस तास पाणी योजनाही अजून पूर्ण झालेली नाही. त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यातच यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांतच उन्हाळा प्रचंड वाढला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत जाऊन दिवसेंदिवस कोरड्या पडणाऱ्याकूपनलिकांची संख्या वाढत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवरच अनेक अपार्टमेंट अवलंबून आहे. त्यासाठी त्यांना मोठी आर्थिक झळही सोसावी लागत आहे.
कृष्णा काठावर वसलेली विद्यानगरी काही वर्षांपूर्वी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होती. मात्र, झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने येथील संसाधनावर प्रचंड मोठा ताण येत आहे. परिणामी, एकेकाळी पाण्यासाठी स्वयंपूर्ण असणारी ही नगरी आज टँकरवर विसंबली आहे. टँकरची मागणी वाढत असल्याने दरही आता तेजी धरू लागले आहेत. कृष्णा काठच्या विद्यानगरीत अनेक अपार्टमेंट पाणी विकत घेऊ लागलेत. यावरून ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या विद्यानगरवासीयांचा घसा कोरडा पडू लागला आहे, हेच
वास्तव आहे. (वार्ताहर)

Web Title: Money to pay for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.