साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह मान्सून दाखल, वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध
By नितीन काळेल | Published: June 12, 2023 01:18 PM2023-06-12T13:18:51+5:302023-06-12T13:19:17+5:30
सातारा शहरात मान्सून दाखल झाल्याने नागरिकांची चिंता मिटली
सातारा : तो केव्हा येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या सातारावासियांसाठी सोमवार चिंता दूर करणारा दिवस ठरला. कारण, उशिरा का असेना मान्सून दाखल झाला. दुपारी पावणे एकच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाची सर कोसळली. यावेळीच वीजपुरवठाही खंडित झाला होता.
जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पण, यंदा हवामान बदलाच्या कारणाने मान्सूनने ओढ दिली होती. त्यामुळे ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागलेली. त्यातच उन्हाळी पाऊसही मोठ्या प्रमाणात नसल्याने ओढे कोरडे पडले आहेत. तलाव आटू लागले असून धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाची आस सर्वांनाच होती. असे असतानाच रविवारी तळकोकणात मान्सून दाखल झाल्याचा सांगावा आल्याने जिल्हावासीयांची चिंता कमी झाली होती. कारण, एक-दोन दिवसांत मान्सून जिल्ह्यात दाखल होईल, असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा होताना दिसून येत आहे.
सातारा शहराबरोबरच पश्चिम भागातील वातावरण सोमवारी सकाळपासूनच बदलले होते. ऊन कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झालेले. तर दुपारी १२ च्या सुमारास अंधारून आले होते. त्यानंतर पावणे एकच्या सुमारास जोरदार वारा सुटला. झाडे हलू लागली तसेच घरावरील पत्र्यांचा आवाज येऊ लागला. त्यानंतर पावसाची जोरदार सर पडली. यामुळे सातारकरांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले. तर या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार घडला.
दरम्यान, सातारा शहरात मान्सून दाखल झाल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. आता दमदार पाऊस पडावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. मान्सून दाखल झाला असलातरी दमदार पाऊस पडला तरच पेरणी वेळेवर होणार आहे.