आला रे जिल्ह्यात मान्सून ! कोयना, महाबळेश्वरला पाऊस
By नितीन काळेल | Published: June 7, 2024 06:41 PM2024-06-07T18:41:38+5:302024-06-07T18:41:48+5:30
तीन दिवस वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
सातारा: अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाला असून गुरूवारी रात्रीपासून पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही हजेरी लावली. तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पावसाला सुरूवात झाली की खरीप हंगाम पेरणीला सुरूवात होते. तसेच टंचाईची स्थितीही कमी होते. पण, गेल्या काही वर्षात मान्सूनचा पाऊस उशिरा येत असल्याचे दिसून आले. पण, यावर्षी मान्सूनचे देशात तसेच महाराष्ट्रातही वेळेवर आगमन झाले आहे. गुरूवारी तळकोकणात मान्सून आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातही आनंद सरी कोसळू लागल्या आहेत. गुरूवारी दुपारपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस पडू लागला आहे. तर सातारा शहरात रात्री ११ नंतर पावसाला सुरूवात झाली. बराचवेळ पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातही पाऊस पडला. यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची तसेच घाट क्षेत्रातील महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि वाई तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोयना येथे २१ मिलीमीटरची नोंद...
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील घाट क्षेत्रात पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणात लवकरच पाणी आवकही सुरू होण्याची शक्यता आहे. तर नवजा येथे १४ आणि महाबळेश्वरला १२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासून महाबळेश्वरला प्रथमच पाऊस पडला आहे.