जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:06+5:302021-06-06T04:29:06+5:30
सातारा : कोकणमार्गे ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस यावर्षी दोन दिवस अगोदरच आला आहे. या पावसाने शनिवारी ...
सातारा : कोकणमार्गे ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस यावर्षी दोन दिवस अगोदरच आला आहे. या पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास साताऱ्यातही जोरदार हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनचा वर्षाव झाला. यामुळे बळीराजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे ८, ९ जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस दाखल होतो. तर कोकणमार्गे ७ जूनच्या आसपास महाराष्ट्रात प्रवेश करतो. पण, यंदा दोन दिवस अगोदरच वेगाने हा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागात मजल मारली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. साताऱ्यातही शनिवारी सायंकाळी सहानंतर जोरदार हजेरी लावली. सात वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसाने झोडपून काढले. यावेळी वारे शांत होते. मात्र, सात नंतर पावसाचा जोर कमी झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने बळीराजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली तर खरीप हंगाम पेरणीला लवकरच वेगाने सुरुवात होणार आहे.
.........................................................................