Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:11 PM2024-07-06T12:11:00+5:302024-07-06T12:11:18+5:30

कुमुदिनी तलाव पर्यटकांचे आकर्षण : प्रतिव्यक्ती पन्नास रुपये तात्पुरती शुल्क आकारणी 

Monsoon tourism opened on Kas Plateau Satara, ban on walking in flower area! | Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.

निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी जिल्हा, राज्यभरातून पर्यटकांची वर्दळ सुरू असून पठारावरील विविध पॉईंट पाहण्याची मागणी पर्यटक करत होते. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत आहेत. पठाराचे संवर्धन, संगोपन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू आहे.

जुन-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. काही तुरळक फुलांचा, कुमुदिनीच्या फुलांचा सूर्योदय मावळेपर्यंत नोव्हेंबर जातो.

फुलांसाठी सध्या पोषक वातावरण असून अद्याप फुलांचा हंगाम सुरू नसून ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राजमार्गावरून कुमुदिनी तलाव, कास धरण दर्शन मचान, नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे पॉईंट पर्यटकांसाठी खुले झाल्यामुळे पर्यटकांना कासचे पर्यटन घडत आहे. पर्यटकांसमवेत सुरक्षा कर्मचारी असून सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटन सुरू आहे.

कास पठार-राजमार्गावर निवाराशेड, स्वच्छतागृहांची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वाॅकीटाॅकीद्वारे संपर्क, अशा अनेकविध सुविधा पावसाळी पर्यटनात उपलब्ध आहेत. परंतु कुमुदिनी तलाव परिसरात निवाऱ्याची कसलीच सोय नसल्याने ऊन, वारा, पावसात आबालवृद्धांपर्यंतची निवाऱ्याची सोय होण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.

फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

पठारावरील विविध पॉईंट पाहण्यास कास पठार खुले आहे. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटनास पूर्णतः बंदी असून कोणी प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रति व्यक्ती पन्नास रुपये तात्पुरते शुल्क आकारून पावसाळी पर्यटन येत्या फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

वनसंपदेचे रक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगाराचे उद्दिष्ट ठेवून विविध पॉईंटच्या निसर्गसौंदर्याचा आनंद मिळण्याच्या हेतूने पर्यटकांच्या मागणीनुसार पावसाळी पर्यटन सुरू केले. पर्यटनावेळी फुलांच्या क्षेत्रात प्रवेश होणार नाही, याची दक्षता घेऊन वनविभागाच्या सूचनांचे पालन करून समिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. -सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

Web Title: Monsoon tourism opened on Kas Plateau Satara, ban on walking in flower area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.