कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची मासिक सभाही ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:38 AM2021-04-24T04:38:57+5:302021-04-24T04:38:57+5:30
वाई : विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या चांदवडी ग्रामपंचायतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ...
वाई : विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या चांदवडी ग्रामपंचायतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ऑनलाईन ग्रामपंचायत मासिक बैठक घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातून भुईंज गटामध्ये पुनर्वसित झालेले चांदवडी हे छोटे गाव किसनवीर सहकारी कारखान्यालगत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या गावचे सरपंच गावकऱ्यांना एकत्र घेऊन विविध योजना राबवत असतात. गेल्या वर्षीपासून त्यांच्या निर्धाराने कोरोनाला थोपवण्यात हे गाव यशस्वी झाले आहे. चांदवडीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही, ही बाब दिलासादायक व अभिमानास्पद आहे. सर्व गावकऱ्यांना हाताशी धरून एकजुटीने काम केल्यामुळे हे यश मिळाल्याचे सरपंच जयदीप शिंदे यांनी सांगितले.
चांदवडीला नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘आर. आर. पाटील सुंदर गाव' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या गावाने नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व लोकसहभागाची सांगड घालून हा पुरस्कार मिळविण्यासाठी झटून प्रयत्न केला होता.
या कोरोना काळातदेखील गावाने सॅनिटायझर, मास्कचा वापर, जंतुनाशके इत्यादी गोष्टी कोरोना थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या आतादेखील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून मासिक बैठक ऑनलाईन घेतली. ही गोष्ट सगळ्या ग्रामपंचायतींना प्रेरणादायक आहे.
या ऑनलाईन सभेसाठी तलाठी एम. बी. भोसले, ग्रामसेवक एस. ए. ढमाळ, उपसरपंच नंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता शिंद, शोभा शिंदे, नरेश वाघ, भिकू कांबळे, संभाजी कुऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.