मनधरणी फिसकटली; गणितं विसकटली!

By admin | Published: November 13, 2016 11:58 PM2016-11-13T23:58:27+5:302016-11-13T23:58:27+5:30

कऱ्हाड पालिका निवडणूक : ‘बंडोबां’नी वाढविली नेत्यांची डोकेदुखी; समन्वयाच्या अभावामुळे गोंधळात गोंधळ

The mood swings; Missing mathematics! | मनधरणी फिसकटली; गणितं विसकटली!

मनधरणी फिसकटली; गणितं विसकटली!

Next

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
पालिकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपानंतर चांगलीच रंगत येऊ लागली आहे. सध्यातरी कऱ्हाडच्या या निवडणुकीवर संधीसाधू राजकारणाचीच छटा असल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू असून, ऐनवेळी बंडखोरांची मनधरणी करण्याची चर्चा फिसकटल्याने आता राजकीय सारीपाटावरील विजयाची मांडलेली गणितेही विसकटलेली आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीचं कऱ्हाडच चित्र सध्या नागरिकांच्या दृष्टीनं गोंधळात गोंधळ वाढविणारच आहे.
निवडणूक जनशक्ती अन् लोकशाही आघाडीची टक्कर हे समीकरण कऱ्हाडकरांना परिचित आहे. पण, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटना नव्याने समोर आल्या आहेत. त्या म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रथमच या निवडणुकीत उतरले असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. माजीमंत्री विलासराव पाटील- उंडाळकरांनी प्रथमच कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी या निवडणुकीत उतरविली आहे. ‘एमआयएम’सारखा पक्ष प्रथमच रिंगणात उतरला आहे. भाजपने प्रथमच पक्षीय पातळीवर जास्तीत जास्त उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरली आहे. तर लोकशाही आघाडी नेहमीप्रमाणे रिंगणात आहे. या आणि इतर अनेक बाबीवरून इथली निवडणूक वेगळी रंगत आणणारी ठरेल, असे वाटत असताना पडद्यामागे घडलेल्या अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे.
भाजप, सेना, एमआयएम यांनी पक्षीय झेंडे खांद्यावर घेतल्यानंतर या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादीही पक्षीय चिन्हावर लढणे पसंत करेल, असे वाटत होते. मात्र, या दोन्ही पक्षांनी ‘आघाडी’ करण्यावरच भर दिला. जुनी ‘जनशक्ती’ एकवटल्याने पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर इच्छुकांची गर्दी वाढली. त्यातून उमेदवार निश्चित करताना नेत्यांचा कस लागला. अन् अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत हा घोळ मिटता मिटला नाही. म्हणूनच आज ‘जनशक्ती’ला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात अन् देशात सत्ता असणाऱ्या भाजपलाही दक्षिणचे ‘मैत्रिपर्व’ जपण्याच्या नादात अनेक चांगले उमेदवार व कार्यकर्ते गमवावे लागले. मग त्यातील काहींनी लोकशाही आघाडीला पसंती दिली. तर काहींनी शिवधनुष्य उचलले. काहींनी मात्र, अपक्ष म्हणूनच उभे राहणे पसंत केले. समन्वयाच्या अभावामुळे प्रभाग सहामधील एका महिला उमेदवाराने नेत्यांच्या परस्पर अर्ज मागे घेतला. अर्जातील त्रुटीमुळे एक अर्ज बाद झाला. तर जिल्हाभर प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने नाईलाजास्तव जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांनी आपला अर्ज मागे काढून घेतला. पण समोरचा उमेदवार बिनविरोध होणार नाही, याची काळजीही घेतली. या निवडणुकीत भाजपने काय कमावलं हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
अनेक वर्षे हुकूमत गाजविणारी ‘लोकशाही आघाडी’ मात्र या निवडणुकीत एकाकी पडलेली दिसली. तरीही चिकाटी, समन्वय, योग्य नियोजन या जोरावर त्यांनी स्वत:चा हुकमी पट्ट्याबरोबर शहरात २२ ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. अन् प्रभाग अकरामधून रत्ना विभुते या महिला उमेदवाराला पुरस्कृत करीत रिंगणात उतरविले आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांचे नेहमीचेच ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाल्याने त्यांचे मतदारांच्या घरीच चहापान सुरू दिसतेय. पण या सगळ्या घडामोडीत आघाडी किंवा पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी मांडलेली गणितं बिघडली आहेत.
‘भोसले’ घराघरात ‘घुसले’
भाजपने पंधरा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. पहिल्यांदाच पक्षीय चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या डॉ. अतुल भोसले यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे भोसलेंच्या कृष्णा उद्योग समूहात कार्यरत असणारे मतदार नागरिक जणू या प्रचारासाठी घराघरात घुसल्याची चर्चा आहे.
‘पतंगा’शिवाय ‘जनशक्ती’
‘पतंग’ अन् ‘जनशक्ताी’ असे कऱ्हाडच्या निवडणुकीत सुमारे पंधरा वर्षे समीकरण झाले होते. सुरुवातीच्या पंचवार्षिकनंतर ‘जनशक्ती’ विसकटल्याने त्यांचा विजयाचा ‘पतंग’ फारसा उडला नाही. पण, आज विसकटलेली जनशक्ती एकवटलेली असताना त्यांना ‘यशवंत’ करण्यासाठी ‘पतंग’ आजबरोबर नाही. त्यांना ‘नारळ’ हे चिन्ह नव्याने मिळाले असून, हे ‘श्रीफळ’ आता मतदारांच्या घरापर्यंत कसे पोहोचविणार यावर बरेच काही अवलंबून आहे, अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे.
उमेदवारी बदलली.. पण
पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती आघाडीने काही प्रभागात दोन इच्छुकांना एबी फॉर्म दिले. त्यातील प्रथम पसंतीचा एबी फॉर्म दिलेल्या तीन उमेदवारांना ऐनवेळी नेत्यांनी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यात नगरसेवक श्रीकांत मुळे यांच्या पत्नी दीपाली मुळे, अशोकराव पाटील व सुनील शिंदे यांचा समावेश आहे. यांनी नेत्यांचा मान राखला खरा; पण नेत्यांनी सगळं काही अलबेल झालं, असे समजण्याची गरज नाही.

 

Web Title: The mood swings; Missing mathematics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.