माढ्यातील घडामोडी मातब्बरांना धोकादायक! : घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:24 AM2018-11-08T00:24:16+5:302018-11-08T00:28:09+5:30

निर्मितीपासूनच चर्चेत राहिेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ वाढत चालली असून, राष्ट्रवादीमधील मातब्बर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारी पावले पडू लागली आहेत. त्यामुळे

Moody activities are dangerous to the beat! : Trends in Speed | माढ्यातील घडामोडी मातब्बरांना धोकादायक! : घडामोडींना वेग

माढ्यातील घडामोडी मातब्बरांना धोकादायक! : घडामोडींना वेग

Next
ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षेमुळे निवडणूक अटीतटीची प्रस्थापितांव्यतिरिक्त दुसरा उमेदवार राष्ट्रवादीकडून शक्य

नितीन काळेल ।
सातारा : निर्मितीपासूनच चर्चेत राहिेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ वाढत चालली असून, राष्ट्रवादीमधील मातब्बर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारी पावले पडू लागली आहेत. त्यामुळे आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे पुन्हा गेल्यास यावेळी मातब्बर घराण्याव्यतिरिक्त दुसराच कोणी उमेदवार असू शकतो. तर सातारा आणि सोलापूरमधील अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे माढ्याची निवडणूक पुन्हा एकदा अटीतटीची होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. या मतदारांघाचे नेतृत्व प्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असून, सध्या विजयसिंह मोहिते-पाटील हे करत आहेत. तर यंदाही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असून, यंदाही खासदार विजयसिंह मोहिते-पाटील इच्छुक आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव समोर येत असून, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही इच्छुक आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी कोणतीही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अनेकजण दावे करू लागले आहेत. अशा घडामोडी घडत असताना या मातब्बर दावेदारांच्या विरोधात भक्कम पावले पडू लागली आहेत. याचे द्योतक हे टेंभुर्णीतील आमदार जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे उत्तमराव जानकर यांच्या बैठकीत आहे.

सातारा जिल्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीयदृष्ट्या पटत नाही. दोघेही संधी मिळाल्यास एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. फलटणचेच रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही रामराजे विरोधकच आहेत. त्यामुळे रामराजेंना माढ्यातून उमेदवारी मिळाली तर गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आघाडी धर्म पाळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. टेंभुर्णीतील बैठक हेच स्पष्ट करते की रामराजेंना आमचा विरोध राहणार. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांनाही यावर विचार करावा लागणार आहे. माण, फलटणमधून विरोध होणार नाही, असाच उमेदवार त्यांना द्यावा लागणार आहे.

दुसरीकडे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यात माळशिरसमधील राजकारणातून तिढा कायम आहे. जानकर यांची राजकीय ताकदही आहे. त्यामुळे जानकर हे मोहिते-पाटील यांच्यासाठी उपद्रवी ठरू शकतात. संजय शिंदे यांचीही मोहिते-पाटील विरोधक म्हणूनच गणना होते. शिंदे यांचा मोहिते-पाटील यांना ठामपणे विरोधच राहणार. तसेच शिंदे हे मोहिते-पाटील यांना पराभूत करण्यासाठी अधिकच प्रयत्न करतील, अशी सद्य:स्थिती आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे हे सर्व एकत्र येऊन मोहिते-पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशीच दबावाची खेळी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तसेच टेंभुर्णीत एकत्र आलेले सारेजण शेवटपर्यंत एकत्र राहिले तर त्यांच्यातील कोणीही उमेदवार ठरू शकतो. संजय शिंदे यांची ताकद माढा विधानसभा मतदारसंघात आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातही त्यांनी गट बांधला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने त्यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. त्यामुळे ते याचा वापर मोहिते-पाटील यांच्या विरोधासाठी करू शकतात. याचाच अर्थ मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक सोपी जाणार नाही व वरिष्ठांनाही दुसऱ्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

दीपक साळुंखे, प्रभाकर देशमुखांत चर्चा...
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघातील गाठीभेटीवर जोर दिला आहे. दुष्काळाच्या निमित्ताने ते जनतेत मिसळू पाहत आहेत. त्यांचा हा सारा रोख लोकसभेसाठीच आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेतली. साळुंखे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या दोघांनीही कोणालाही उमेदवारी मिळू द्या, आपण एकमेकांना सहकार्य करू, असे चर्चेत ठरले आहे.
 

छुपा विरोध राहणार...
करमाळा मतदारसंघात बागल गट, आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट आहे. जगताप आणि आमदार पाटील हे मोहिते-पाटील यांना मदत करू शकतील; पण बागल गट हा मोहिते-पाटील यांना छुपा विरोध करणार, हे निश्चित आहे. तसेच शिवसेना-भाजप युती झालीतर आमदार पाटील यांची भूमिका बदलू शकते.
 

सुभाष देशमुख यांचा निर्णय पक्षावर...
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २००९ ला माढ्याची निवडणूक लढविली आहे. त्यावेळी चांगली मते घेतली होती. तसेच त्यांचा या मतदारसंघात संपर्क असतो. काही दिवसांपूर्वीच देशमुख करमाळ्याची बैठक करून माढ्याकडे जाताना कुर्डुवाडीत विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींनी कोठेही निवडणुकीसाठी लढायला सांगितले तर तयार आहे, असे सांगितले. यावरून ते माढ्यासाठी निवडणूक रिंगणात उतरू शकतात.

Web Title: Moody activities are dangerous to the beat! : Trends in Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.