नवजा अन् महाबळेश्वरला १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:20+5:302021-07-21T04:26:20+5:30

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, नवजा येथे १५२, महाबळेश्वरला ११३ आणि कोयना ...

More than 100 mm of rain in Navja and Mahabaleshwar | नवजा अन् महाबळेश्वरला १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस

नवजा अन् महाबळेश्वरला १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस

googlenewsNext

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, नवजा येथे १५२, महाबळेश्वरला ११३ आणि कोयना येथे ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण अर्धे भरले असून, मंगळवारी सकाळच्या सुमारास ५४.०५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २४ तासांत धरणात जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर पावसात तीन आठवड्यांचा खंड पडला होता. अपवादात्मक परिस्थितीत पाऊस होत होता; मात्र मागील १० दिवसांपासून हळूहळू पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडत होता. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पश्चिम भागातील कास, तापोळा, कोयना, पाटण, परळी, ठोसेघर, केळघर परिसरात भात लागणीला वेग आला आहे. त्याचबरोबर सतत पाऊस सुरू असल्याने कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसारख्या प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढू लागला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक १५२ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत तेथे १९७६ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयनेला ८९ व जून महिन्यापासून १४०१ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ११३ आणि यावर्षी आतापर्यंत १९४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी पश्चिम भागात पाऊस अधिक झाला.

सोमवारी सकाळी कोयना धरणात ५१.४९ टीएमसी पाणीसाठा झालेला, तर मंगळवारी ५४.०५ टीएमसी साठा झाला होता. कोयना धरणात २४ तासांत जवळपास अडीच टीएमसी पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास २८६५४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पश्चिम भागात पाऊस होत आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाची अधूनमधून हजेरी आहे; पण, या पावसात जोर नाही. तसेच अनेक गावचे ओढे अजूनही कोरडे पडलेले आहेत.

चौकट :

साताऱ्यात सरी...

सातारा शहर व परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे; पण हा पाऊस सलग पडत नाही. दिवसात अनेक वेळा सरी येऊन पडतात. या सरींमुळे मात्र सर्वत्र पाणी पाणी होत आहे. मंगळवारी सकाळी तसेच दुपारीही पावसाच्या अनेक सरी पडल्या.

.........................................................

Web Title: More than 100 mm of rain in Navja and Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.