दोनशेहून अधिकांना चिकुन गुनियाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:01 AM2017-11-01T01:01:56+5:302017-11-01T01:04:01+5:30

More than 200 pieces of chicken bunions | दोनशेहून अधिकांना चिकुन गुनियाची साथ

दोनशेहून अधिकांना चिकुन गुनियाची साथ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी : तुपेवाडी (काढणे) येथे दोनशेहून अधिक नागरिक चिकुन गुनियासदृश्य आढळले आहे. गावात आठ दिवसांपासून ही परिस्थिती उद्भवली असतानाही केवळ एकच दिवस रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक आले होते.
तुपेवाडीतील रुग्णांना तळमावले येथील शासकीय तसेच खासगी दवाखान्यात दाखल केले आहेत. रुग्णांची संख्या जास्त आणि रुग्णालये कमी पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाटण तालुक्यातील तुपेवाडी हे तीनशे लोकसंख्येचं छोटसं गाव. या ठिकाणी शासनाकडून वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोणी आजारी पडल्यास तळमावले आरोग्य केंद्र तसेच खासगी दवाखान्यात न्यावे लागते. तुपेवाडीत गेल्या आठ दिवसांपासून सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांना चिकुन गुनियासदृश्य साथीने विळखा घातला आहे. अपुरे वैद्यकीय उपचार, साथीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
साथीची तीव्रता मंगळवारी अधिकच वाढली. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
गावात निर्माण झालेल्या साथरोगामुळे त्याची लागण झालेल्या रुग्णांना ताप-थंडीसह हात-पाय दुखणे, थकवा येणे आदींचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
साथीचे वाढते प्रमाण पाहता तळमावले आरोग्य केंद्र्रात आठ दिवसांत पन्नासहून अधिक तर खासगी रुग्णालयात दीडशेहून अधिक रुग्णांना दाखल केले आहे. रुग्ण वाढत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालये चिकुन गुनियासदृश्य रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली. वैद्यकीय पथकासह ग्रामपंचायतीकडून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अबब...आठ दिवसांत बसला लाखोंचा फटका !
तुपेवाडी या वस्तीतील प्रत्येक कुटुंबातील अपवाद वगळता सर्वांनाच चिकुन गुनियासदृश्य साथीने ग्रासले आहे. गावातील साथसदृश्य रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या, औषधे आणि वैद्यकीय अधिकाºयांकडून केले जाणारे उपचार याचा फटका गावातील सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना बसला आहे. या साथरोगामुळे आठ दिवसांपासून गावातील शेतमजुरांचा रोजगार बुडालेला असल्याने त्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचे येथील ग्रामस्थ व महिलांनी सांगतात.
नातेवाइकांकडे स्थलांतर
तुपेवाडी गावात चिकुन गुनियासदृश्य साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या साथरोगाची लागण लहान मुलांना होऊ नये तसेच त्यापासून जे बचावले आहेत. अशांनी आपल्या नातेवाइकांकडून तात्पुरत्या स्वरुपात राहण्यास पसंती दर्शविली आहे.
दिसता डास भरतेय धडकी
सुमारे तीनशेच्या वर लोकसंख्या असलेल्या तुपेवाडी गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून किती प्रयत्न केले जातात. गावात आरोग्य शिबिरे, लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या शासनाकडून आरोग्य तपासणी केल्या जातात का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे गावात चिकुन गुनियासदृश्य साथीने इतका फैलाव घातला आहे की, गावातील एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गटारावर एक डास जरी बसलेला दिसला तरी गावातील लोकांना धडकी भरत आहे.

Web Title: More than 200 pieces of chicken bunions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.