कोयनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा
By admin | Published: July 3, 2017 01:37 PM2017-07-03T13:37:57+5:302017-07-03T13:37:57+5:30
धरण क्षेत्रात पाऊस : गतवषीर्पेक्षा यंदा पातळी चांगली
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0३ : जिल्ह्यातील पश्चिम भागात यावर्षी पावसाने वेळेवर आणि जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढू होऊ लागली आहे. गेल्यावषीर्चा विचार करता कोयना धरणात यावर्षी दुप्पटीपेक्षा अधिक साठा आहे. तर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडीमध्येही गतवषीर्पेक्षा अधिक पाणी आहे. मात्र, बलकवडी धरणातील पाणीसाठा बरोबरीत आहे.
गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पावसालाही सुरूवात जुलै महिन्यातच खऱ्या अथार्ने झाली होती. परिणामी धरणात पाणीसाठा होण्यास तसा उशिरच झाला होता. सुरुवातीच्या काळातही पावसात जोर नव्हता. त्यामुळे चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे धरणे भरण्यासही वेळ लागला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज होता. पण, सुरूवातीला हजेरी लाऊन पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चिंता लागून राहिली होती. सातारा शहरातील पाण्याचे नियोजनही एक दिवसाआड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दडी मारलेल्या पावसाने दहा दिवसांपासून बरसण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदारपणे पाऊस होत आहे. महाबळेश्वरला तर आठ दिवसांपासून संततधार आहे. त्यामुळे वेण्णा लेक भरुन वाहिला. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या धरणातही गतवषीर्पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १५ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २ जुलैपर्यंत कोयनेत १३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १२.९१ होती. तर यावर्षी कोयनेतील पाणीसाठा ३२ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. धोम धरणात सध्या ३.३८ टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी २.७८ टीएमसी पाणीसाठा होता. कण्हेरमध्ये २.३५ असून गतवर्षी १.९२ टीएमसी पाणी आहे. उरमोडीत ४.९९ तर गतवर्षी ३.६२ आणि तारळीत १.३९ आणि गतवर्षी १.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बलकवडी धरणात गतवर्षी ऐवढाच म्हणजे १३.८१ टक्के ऐवढा पाणीसाठा आहे.
पूर्व भागात प्रतीक्षा...
जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पेरणी करायची का नाही, अशी स्थिती आहे. तर अनेकांनी निसर्गावर भरवसा ठेऊन पेरणी केली आहे.