व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 04:42 PM2021-11-16T16:42:45+5:302021-11-16T16:43:53+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.

More Leopard Shivara than Tiger Project | व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात!

व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात!

Next

कऱ्हाड : वन्य प्राण्यांची मोजदाद वन्यजीव विभागाच्या हद्दीत म्हणजेच राखीव क्षेत्रात होते; पण प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् कुठे प्राणी वावरतायत, हेच या विभागाला माहिती नसतं. बिबट्याचंही असंच झालंय. प्रादेशिक वनहद्दीसह शिवारात त्यांची संख्या किती, हेच निश्चित नाही. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.

प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र गावोगावी डोंगररांगांमध्ये विखुरले गेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात वावरणाऱ्या प्राण्यांचा मागमूस काढणे कठीण. मात्र, प्राण्यांची जेवढी विविधता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळून येते, त्याचपटीत कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी डोंगररांगांमध्ये वावरत असल्याचे प्राणी अभ्यासकांचे मत आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील वाढत्या बिबट्याप्रवण क्षेत्राचा विचार करता प्रादेशिक हद्दीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांपेक्षा जास्त बिबटे वावरत असल्याचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.

दरम्यान, मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांच्या प्रादेशिक वनहद्दीत सुमारे १०० बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते, असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक नाना खामकर यांनी सांगितले.

प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र

१२,५८५.५७ : राखीव क्षेत्र
१४.६५ : अवर्गित क्षेत्र
५५३.६७ : संपादित क्षेत्र
०.० : संरक्षित क्षेत्र
१३१५३.७९ : एकूण क्षेत्र
(क्षेत्र हेक्टरमध्ये)

कऱ्हाडचे बिबट्याप्रवण क्षेत्र

मलकापूर : ७७०.०४
नांदगाव : ७२८.१९
कोळे : १०३९.४२
कासारशिरंबे : ५८५.११०
तांबवे : ९००.९२
म्हासोली : ८३२.५२
वराडे : १२८४.४००
म्होप्रे : ९१६.१८०
(आकडेवारी हेक्टरमध्ये)

२५३ जनावरांची शिकार
२०१३-१४ : २०
२०१४-१५ : १६
२०१५-१६ : ३४
२०१६-१७ : ४४
२०१७-१८ : ७९
२०१८-१९ : ४४
२०१९-२० : ४८
२०२०-२१ : ४०
एकुण २५३

४४ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची संख्या

उपाशी बिबट्यांचा धोका अधिक

बिबट्या उपाशी असेल तर तो अधिक हिंस्र बनतो, असे प्राणीतज्ज्ञ सांगतात. भक्ष्याच्या शोधात तो फिरत असतो. मात्र, भक्ष्य नाही मिळाले तर मानवी वस्तीनजीक पाळीव जनावरांवर तो हल्ला चढवतो. दोन ते तीन दिवसांत एकदाच तो शिकार करतो, असेही प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.

जंगल हा अधिवासच बिबट्या विसरला असून, उसाचे शेत हेच जंगल असल्याचा अनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक वनहद्दीत म्हणजेच कोयना आणि चांदोली अभयारण्य वगळता कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील इतर प्रदेशांत शंभरापेक्षा जास्त बिबटे असावेत. - नाना खामकर, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो

बिबट्याप्रवण क्षेत्र कमालीचे वाढले आहे. वारंवार हल्लेही होत आहेत. हा प्राणी २४ तासांत सुमारे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रात फिरतो. सध्याचे बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र पाहता प्रत्येक बीटमध्ये किमान दोन ते तीन बिबटे असावेत. आणि त्यांची एकूण संख्या ‘सह्याद्री’तील संख्येपेक्षा जास्त असावी.  - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: More Leopard Shivara than Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.